ट्रेन, बस याने अनेक जण प्रवास करतात. पण, या सगळ्यात विमानातून प्रवास करणे थोडे वेगळे असते. विमानातून प्रवास करताना सुरक्षेच्या गोष्टींवर विशेष लक्ष देण्यात येते. विमानात चढण्यापूर्वी तुमचे सगळे सामान तपासले जाते. सामान तपासण्यासाठी तिथे सुरक्षा कर्मचारी आणि काही यंत्रसुद्धा असतात. तर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एक चिमुकला विमानतळावर आई-बाबांची नजर चुकवून सामान तपासणाऱ्या यंत्रावर जाऊन बसला.
व्हायरल व्हिडीओ विमानतळाचा आहे. व्हिडीओमध्ये चिमुकला कन्व्हेयर बेल्टवर (conveyor belt) चढतो. कन्व्हेयर बेल्ट म्हणजे एअरपोर्टवर किंवा अनेक सार्वजनिक ठिकाणी हे यंत्र तुम्हाला अनेकदा दिसले असेल, जिथे आपले सामान तपासून पुढे ढकलण्यात येते. तर पालकांचे लक्ष नसताना चिमुकला अचानक इथे चढतो आणि अगदीच आरामात बसतो. कन्व्हेयर बेल्टवर काही सामानसुद्धा असते. या सामानाच्या पुढे बसून चिमुकला आनंद लुटताना दिसतो आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ तुम्हीसुद्धा एकदा बघा.
हेही वाचा…VIRAL VIDEO: बापरे! चोरट्यांनी चक्क जेसीबीने केली चोरी; लाखो रुपयांनी भरलेले एटीएम रातोरात उखडले
व्हिडीओ नक्की बघा :
विमानतळावर कन्व्हेयर बेल्ट या यंत्राद्वारे चिमुकला ५० सेकंद असाच फिरत असतो. काही वेळाने तिथे उपस्थित दोन कर्मचाऱ्यांचे चिमुकल्याकडे लक्ष जाते. एक कामगार यंत्र बंद करतो आणि यंत्रावर चढून चिमुकल्याला उचलून दुसऱ्या कामगाराच्या हातात देतो आणि दोघे चिमुकल्याला तिथून घेऊन जातात. आई-बाबांची नजर चुकवून चिमुकला विमानतळावर एकटा फिरताना दिसला. चिमुकल्याला विमानतळावरील सामान तपासणारे यंत्र एक खेळणं वाटते, म्हणून चिमुकला यावर जाऊन बसतो.
विमानतळावर उपस्थित कर्मचाऱ्यांनी हे बघताच यंत्र बंद करून चिमुकल्याला सुखरूप बाहेर काढले आणि त्याच्या पालकांकडे घेऊन गेले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @crazyclipsonly या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेक जण हा व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहेत. तसेच सोशल मीडियावर या धक्कादायक व्हिडीओने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.