Viral Video : उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांच्या बाबतीत सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगताना दिसतात. उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन मंगळवारी रशियाला पोहोचले. ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेतील. या दौऱ्यामुळे त्यांची खासगी रेल्वे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण- त्यांनी रशियाला पोहोचण्यासाठी विमानाचा नाही तर रेल्वेचा वापर केला आहे. प्योंगयांग ते रशियाच्या व्लादिवोस्तोक शहरापर्यंत त्यांनी याच रेल्वेने प्रवास केला होता. तर आज सोशल मीडियावर त्यांच्या खासगी रेल्वेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात किम यांची मर्सिडीज मेबॅक खासगी रेल्वेमध्ये पार्क करताना दिसून आली आहे
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांची ताईयांघो रेल्वे तुम्हाला दिसेल. या रेल्वेच्या बाजूला एक बॉडीगार्ड तुम्हाला दिसेल. आणि रेल्वेच्या आतमध्ये किम जोंग उन यांची मर्सिडीज मेबॅक उभी आहे. किम यांची ही मर्सिडीज मेबॅक रेल्वेमध्ये पार्क करण्यात येत आहे. किम यांची मेबॅक कशी पार्क केली जात आहे एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच.
हेही वाचा…आमच्या पप्पांनी गणपती आणला! रीलस्टार साईराजनंतर ‘या’ चिमुकल्याचा Video जिंकतोय नेटकऱ्यांचं मन
व्हिडीओ नक्की बघा :
किमच्या खासगी रेल्वेचं नाव ‘ताईयांघो’ असे आहे. अनेक प्रकारची सेवा उपलब्ध असलेल्या या रेल्वेचा इतिहाससुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. किम जोग उन यांचे वडील व आजोबा याच रेल्वेचा उपयोग करून परदेशात जात होते. हीच परंपरा पाळण्यासाठी किम जोंग उन रेल्वेने प्रवास करतात. ताईयांघोमध्ये रिसेप्शन हॉल, हॉटेल, सॅटेलाइट टीव्ही, फोन, मेडिकल रूम, डायनिंग रूम, तसेच रेल्वेच्या खिडक्या आणि दरवाजे बुलेटप्रूफ; तर ट्रेनच्या भिंती स्फोटरोधक आहेत असे सांगण्यात येत आहे.
ताईयांघो ट्रेनमध्ये मेबॅक पार्क करतानाचा व्हिडीओ @kimjongun69X यांच्या अधिकारिक ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि “मला एक नवीन चालक हवा आहे; बिडेन आता माझी कार हाताळू शकत नाही”, असे मजेशीर कॅप्शन दिले आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून एक युजर “मोठी रेल्वे घ्या”, असे आवाहन किम जोंग उन यांना कमेंटमध्ये करताना दिसून येत आहे. अत्याधुनिक सुविधा असणारी किम जोंग उन यांची ही ट्रेन पुन्हा एकदा ट्रेंड होताना दिसत आहे.