सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मार्कंडेय काटजू हे नेहमीच आक्षेपार्ह वक्तव्य  करत वाद ओढावून घेत असतात. आतापर्यंत  फेसबुकवर अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करत ते वादाच्या भोव-यात सापडले आहेत. आता बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यावर टिका करत त्यांनी नवा वाद ओढावून घेतला आहे. अमिताभ बच्चन यांचे डोके रिकामी असल्याचे वादग्रस्त विधान त्यांनी फेसबुकवर केले आहे. अमिताभ बच्चन यांचा ‘पिंक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यानंतर त्यांनी ही टिपणी केली आहे. ‘अमिताभ बच्चन हा रिकामी डोक्याचा माणूस असून अनेक पत्रकार त्यांची स्तुती करत असतात पण आता मला त्या पत्रकरांचेही डोके रिकामी आहे की काय अशी शंका येत आहे’ अशा प्रकारची पोस्ट त्यांनी केली. त्यांच्या या व्यक्तव्यानंतर अनेकांनी असे विधान करण्यामागचे कारण त्यांना विचारले असता त्यांनी आपल्या विधानाचे स्पष्टीकरण दिले आहे.
‘कार्ल मार्क्स म्हणतात की धर्म हा अफू सारखा असतो. लोकांनी बंड करू नये यासाठी त्यांना गुंगीत ठेवण्याकरता सत्ताधा-यांकडून धर्म नावाच्या अफूचा वापर केला जातो. पण भारतीयांना शांत ठेवण्यासाठी अशा विविध प्रकारच्या ड्रग्जचा वापर केला जातो. त्यांच्यासाठी एकच औषध पुरेसे नाही. म्हणूनच धर्माबरोबर माध्यम, चित्रपट, क्रिकेट, बाबा, भविष्य हे फंडे वापरून जनतेला मुठीत ठेवता येते. यातला सगळ्यात उत्तम म्हणजे चित्रपट. एका रोमन राज्यकर्त्याने सांगितले आहे कि जर तुम्ही लोकांना पोटापाण्याचे साधन उपलब्ध करून देऊ शकत नाही तर त्यांच्या मनोरंजनाची सोय करुन त्यांना गुंतून ठेवा. अमिताभ बच्चन, देवानंद, शम्मी कपूर, राजेश खन्ना यांचे चित्रपटही असेच आहेत हे चित्रपट म्हणजे लोकांना शांत ठेवण्याचे नेत्यांच्या हातातील चांगले हत्यार असल्याचा लांबलचक खुलासा त्यांनी केला. इतकेच नाही तर अभिताभ बच्चन यांनी चांगल्या अभिनया व्यतिरिक्त समाजातील समस्या सोडवण्यासाठी काय केले असा वादग्रस्त सवाल देखील त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून विचारला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर बच्चन यांचे चाहते मात्र काटजू यांच्यावर चिडले आहेत.