रेल्वेच्या डब्यात कोणीतरी वेपन, गन असे शब्द जोरजोरात म्हणत असतो…बाहेर असणारा रेल्वेचा कर्मचारी हे शब्द ऐकतो आणि ट्रेनचा अलार्म वाजवतो… आपल्या वरिष्ठांना रेल्वेत अशाप्रकारचे आवाज येत असल्याचेही कळवतो. यामुळे रेल्वे थांबते आणि सुरक्षा यंत्रणा हा आवाज नेमका कुठून येतोय याचा शोध घ्यायला लागते.
बराच शोध घेतल्यावर एक ३५ वर्षांचा पर्शियन विनोदी कलाकार रेल्वेच्या टॉयलेटमध्ये हे शब्द जोरजोरात बोलत असल्याचे समजते. आपल्या नाटकातील भूमिकेसाठी वेपन, गन या इंग्रजी शब्दांची तालिम तो करत असल्याचे नंतर केलेल्या चौकशीत लक्षात आले. अशाप्रकारच्या शब्दांचे आवाज आल्याने रेल्वे थांबवून त्याठिकाणी सुरक्षादलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. मात्र हा कलाकार तालिम करत असल्याचे लक्षात आल्यावर सुरक्षा यंत्रणाही हैराण झाली आणि काय करावे ते त्यांनाही कळेनासे झाले. मात्र अशाप्रकारे शब्द म्हणणारा हा व्यक्ती दहशतवादी नसून कलाकार असल्याचे समजल्यावर सगळ्यांचाच जीवात जीव आला. पण तो कोणत्या नाटकासाठी सराव करत होता ते मात्र शेवटपर्यंत कळाले नाही.
पॅरीसमध्ये २०१५ मध्ये झालेल्या हल्ल्यांनंतर फ्रान्समध्ये आणीबाणी जाहीर कऱण्यात आली होती. त्यावेळी जिहादींकडून १३० जणांना ठार कऱण्यात आले होते. त्यामुळे अशाप्रकारचे शब्द ऐकू आल्यावर एकच दहशत पसरली होती. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनूसार, जगभरात आता दहशतवाद मोठ्या प्रमाणात पसरला आहे. त्यामुळे पुन्हा हा धोका देश स्विकारु शकत नसल्याने या पर्शियन नागरीकाच्या घटनेला गांभिर्याने घेण्यात आले.