scorecardresearch

आता इलॉन मस्कला विकत घ्यायचीय कोका-कोला कंपनी?; McDonald’s बद्दलही ट्विट करत म्हणाला, “मी चमत्कार…”

४४ अब्ज डॉलरमध्ये मस्क यांनी काही दिवसांपूर्वीच ट्विटर कंपनी विकत घेतलीय त्यानंतर आता त्यांनी हे ट्विट केलंय.

Elon Musk Coca Cola Tweet
मस्क यांनी केलेलं ट्विट चर्चेत (फाइल फोटो)

Elon Musk Tweet on Coca Cola: टेस्ला मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वीच ट्विटर कंपनीचा संपूर्ण मालकी हक्क विकत घेतला. १०० टक्के मालकी हक्क विकत घेण्यासाठी मस्क यांनी ५४.२० डॉलर प्रतिसमभागाप्रमाणे कंपनीला ऑफर दिलेली. कंपनीने ही ऑफर स्वीकारली असून ४४ अब्ज डॉलरमध्ये मस्क हे ट्विटरचे नवे मालक झाले आहेत. मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर आता पुढे काय होणार याबद्दल उत्सुकता लागून राहिलेली असतानाच मस्क यांनी केलेल्या एका ट्विटमुळे ते पुन्हा चर्चेत आले. त्यांनी आत थेट जगप्रसिद्ध अशा कोका-कोला या कंपनीला विकत घेणार असल्याची घोषणा केलीय. त्यांनी यासंदर्भात केलेलं एक ट्विट चर्चेत आहे.

मस्क यांनी भारतीय वेळेनुसार आज सकाळी सहा वाजून २६ मिनिटांनी एक ट्विट केलंय. अगदी मोजक्या शब्दांमध्ये मस्क यांनी हे ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी, “मी कोका-कोला कंपनी विकत घेणार आहे,” असं म्हटलंय. हे ट्विट प्रचंड व्हायरल झालं आहे. तीन तासांमध्ये या ट्विटला तीन लाखांहून अधिक जणांनी रिट्विट केलंय. तर साडेचौदा लाख लोकांनी हे पसंत केलं आहे. या ट्विटवरुन सोशल मिडायावर तुफान चर्चा सुरु झाली असून कोका-कोला कंपनी ट्विटवर टॉप ट्रेण्डमध्ये आलीय.

काही आठवड्यांपूर्वी मस्क यांनी ट्विटरमधील ९.२ टक्के भागभांडवल विकत घेतले होते. त्यांनतर ते ट्विटरमधील सर्वात मोठे भागधारक बनले होते. मात्र त्यांनी कंपनीच्या संचालक मंडळात सहभागी होण्यास नकार दिला होता. कंपनी खासगी असेल तर त्यात बदल घडवता येतात असंही यावेळी ते म्हणाले होते. मस्क यांनी ट्विटर खरेदीसाठी दिलेल्या प्रस्तावानंतर ट्विटरच्या समभागाने ९ टक्क्यांची उसळी घेतली होती. त्यानंतर काही दिवसांनी मस्क यांनी ट्विटर विकत घेतलं होतं. त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करताना मुक्तपणे संवाद करण्याचं हे माध्यम अधिक युझर फ्रेण्डली आणि ओपन सोर्स माध्यम झालं पाहिजे असं मस्क म्हणाले होते.

याच खासगी कंपनी असल्यावर बदल करतात येतात या धोरणानुसार आत मस्क यांनी कोका-कोलासंदर्भात ट्विट केलंय. खरं म्हणजे मस्क यांनी हे ट्विट एक विनोद म्हणून पोस्ट केलं आहे. कोका-कोला बनवण्यासाठी वापरला जाणारा फॉर्म्युला आपल्याला जाणून घ्यायाचाय असा यामागील अर्थ असल्याचं सांगितलं जातंय. कोकेनचा वापर कोका-कोला बनवताना केला जात असल्याने हा नेमका फॉर्म्युला काय आहे हे जाणून घेण्यासाठी मस्क अटलांटामधील ही कंपनीच विकत घ्यायला निघालाय. “मी कोका-कोला कंपनी विकत घेणार आहे, त्यात पुन्हा कोकेन टाकण्यासाठी” असं मस्क यांचं संपूर्ण ट्विट आहे.

या ट्विटनंतर मस्क यांनी मॅकडॉनल्ड्स हा प्रसिद्ध फास्टफूड ब्रॅण्ड विकत घेण्यासंदर्भातील एक स्क्रीनशॉर्ट पोस्ट केलाय. यामागील कारण देताना त्यांनी मॅक्-डीमधील सर्व आइस्क्रीम मशीन ठीक करायच्या आहेत असं म्हटलंय. मात्र आपल्या या जुन्या ट्विटवर आता प्रतिक्रिया देताना, “मी चमत्कार करु शकत नाही,” असा उपहासात्मक टोला त्यांनी लागवलाय.

अन्य एका ट्विटमध्ये मस्क यांनी ट्विटरला जरा जास्त मनोरंजक आणि मजेदार बनवूयात असं आवाहन युझर्सला केलं आहे.

दरम्यान, ट्विटर विकत घेतल्यानंतर मुक्तपणे बोलणं, व्यक्त होणं हा लोकशाहीचा कणा आहे. ट्विटर हे असं डिजीटल माध्यम आहे ज्यावर भविष्यात मानवी जीवनावर परिणाम करु शकणाऱ्या गोष्टींबद्दल चर्चा होतात, असं मस्क यांनी म्हटलेलं. तसेच, “मला ट्विटरमध्ये आणखी नवीन फिचर्स आणायचे आहेत. लोकांचा या माध्यमावरील विश्वास वाढवण्यासाठी हे एक ओपन सोर्स अल्गोरिदम असणारं माध्यम करायचं आहे, स्पॅम बोट्स, सर्व व्यक्तींचं ऑथेंटिकेशन अशी बरीच काम डोक्यात आहेत. ट्विटरमध्ये फार क्षमता आहे. मी कंपनीसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे. तसेच या माध्यमावर असणाऱ्यांसाठी नवीन दारं उघडली जाणार आहेत,” असं म्हणत मस्क यांनी भविष्यातील बदलांचे संकेत दिलेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: After twitter elon musk wants to buy coca cola company scsg

ताज्या बातम्या