Air India Viral Video : विमानातून प्रवास करताना सांगितलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असते. मात्र, काही बेशिस्त प्रवासी ‘या’ नियमांना बगल देत स्वत:चा शहाणपणा करताना दिसतात. त्यामुळे इतर प्रवाशांनादेखील त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. एअर होस्टेदेखील अशा नियम मोडणाऱ्या प्रवाशांना समजवण्याचा प्रयत्न करतात; पण त्यांना हे प्रवासी काही वेळा जुमानत नाहीत. सध्या अशाच एका संतापजनक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून युजर्स विमानातून प्रवास करणाऱ्या भारतीय प्रवाशांच्या बेशिस्त वर्तनावर चांगलेच भडकले आहेत.

व्हिडीओत एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणारे काही भारतीय प्रवासी क्रू मेंबर्सकडून दिल्या जाणाऱ्या सुरक्षा सूचनांकडे दुर्लक्ष करताना दिसतायत.

नेमकी घटना काय?

बँकॉक ते दिल्ली या एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने विमानाच्या आतील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यात काही बेशिस्त प्रवासी कसे सुरक्षा सूचनांकडे दुर्लक्ष करतायत हे दिसतेय. त्यामुळे त्याने कॅप्शनमध्ये अशा प्रवाशांसाठी लिहिले की,”लोकं भारतीयांना उगाच नाव ठेवत नाही”

या घटनेविषयी सांगताना त्याने लिहिले की, तो एअर इंडियाच्या विमानाने बँकॉकहून दिल्लीला येत होता. यावेळी विमान काही मिनिटांत धावपट्टीवर लँड होणारच होते. केबिन क्रू मेंबर्स बेल्ट घालून बसले होते. मात्र, काही प्रवासी उभे राहू लागले. त्यानंतर ते ओव्हरहेड बॉक्स उघडू लागले. यावेळी क्रू मेंबर्स त्यांना वारंवार बसण्याची विनंती करीत होते; मात्र त्याकडे दुर्लक्ष करून, काही प्रवासी आपल्या आसनावरून उठून पुढे गेटच्या दिशेने जाऊ लागले.

त्या बेशिस्त प्रवाशांना क्रू मेंबर्स मागून ओरडून ओरडून सांगतायत की, सीट बेल्ट लाइट सुरू असल्याने आपल्या आसनावर बसा; पण ते कोणी ऐकण्यास तयार नव्हते.

केबिन क्रू मेंबर्स विनंत करीत राहिले; पण ते लोक दुर्लक्ष करत राहिले. त्यामुळे हा जागरूकतेचा अभाव नाही; हा मूलभूत नागरी जाणिवेचा अभाव आहे, असे तो युजर्स म्हणाला. दरम्यान, अनेकांनी अशा प्रवाशांवर तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. अनेकांनी कमेंट्समध्येही यावर आपापली प्रतिक्रिया दिली आहे.

एका युजरने लिहिले की, प्रत्येक स्तरावर दंड असायला हवा. मगच लोक वठणीवर येतील. दुसऱ्याने लिहिले की, ते १५ सेकंद वाचवण्यासाठी १० मिनिटं तिथे उभे राहतील. नंतर इतर सर्वांच्या बेल्टसाठी ३० मिनिटे वाट पाहतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिसऱ्याने लिहिले की, जेव्हा जेव्हा मला मधली किंवा शेवटची सीट मिळते तेव्हा तेव्हा मी दार उघडल्याशिवाय उठत नाही. पण, माझ्याआधी उठून पुढे गेलेले प्रवासी खूप अस्वस्थ होतात. शेवटी एकाने म्हटले की, काही वर्षांपूर्वी मलेशियाच्या फ्लाइटमध्ये माझ्याबरोबरही असंच घडलं होतं. जेव्हा एअर होस्टेसने सर्वांना बसण्याची विनंती केली, तेव्हा फक्त भारतीय प्रवासीच बसत नव्हते. हे खरोखरच लाजिरवाणे आहे.