अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा ही गोष्ट जगातील सगळ्यात लोकप्रिय कथांपैकी एक आहे. आज तुम्हालाही या गोष्टीतील अल्लाउद्दीनची एक झलक पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक तरुण अल्लाउद्दीनसारखा अगदी हुबेहूब तयार होऊन आला आहे आणि दिल्ली व गुरुग्रामच्या रस्त्यावर त्याची जादू दाखवताना दिसला आहे; जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
व्हायरल व्हिडीओ गुरुग्राम आणि दिल्लीचा आहे. गुरुग्राम आणि दिल्लीच्या गजबजलेल्या रस्त्यांवर एक तरुण अल्लाउद्दीनच्या रूपात सगळ्यांसमोर आला आहे. त्याने हुबेहूब अल्लाउद्दीनसारखी वेशभूषा केली आहे आणि तो त्याच्या जादुई गालिचावर जादू दाखवताना दिसला आहे. हा जादुई गालिचा तयार करण्यासाठी त्याने चार चाकांची एक लाकडाची फळी तयार केलेली असते; ज्यावर रेड कार्पेट घातलेले असते. तो या लाकडाच्या फळीवर उभा राहून, तर कधी बसून रहदारीच्या रस्त्यावरून फिरताना दिसत आहे. अल्लाउद्दीनचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघा…
हेही वाचा… “पोरी येरा केलास मला…” भात लावणी करताना आजीनं गायलं भन्नाट गाणं, नेटकरी म्हणतात “वय केवळ आकडा”
व्हिडीओ नक्की बघा :
तरुण लाकडावर तयार करून घेतलेल्या रेड कार्पेटवर उभा राहून रहदारीच्या रस्त्यावरून फिरतो आहे आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांशी हात मिळवताना, तसेच मॅक्डोनाल्डमधून आइस्क्रीम घेऊन खातानाही दिसून आला आहे. यादरम्यान तरुण एकदाही त्याच्या या जादुई कार्पेटवरून उतरलेला नाही. तसेच व्हिडीओच्या सगळ्यात शेवटी रस्त्यावर एका ठिकाणी थांबून तो आपले जादुई रेड कार्पेट बोटांच्या इशाऱ्यांवर हलवीत जादू दाखवताना दिसत आहे. तसेच यादरम्यान रस्त्यावर अल्लाउद्दीनचा लूक करून फिरणाऱ्या तरुणाचे अनेक जण फोटो काढतानाही दिसून आले आहेत.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ Reddit या ॲपवरून शेअर करण्यात आला आहे. अल्लाउद्दीनच्या लूकमध्ये तयार झालेला हा तरुण सोशल मीडियाचा कन्टेंट क्रिएटर आहे; ज्याचे नाव केतन असे आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून काही जण या तरुणाबाबत चिंता व्यक्त करताना दिसून आले आहेत. कारण- त्याने रहदारीच्या रस्त्यावर हा अनोखा व्हिडीओ शूट केला आहे; जे त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही अगदीच धोकादायक आहे. तसेच काही जण कमेंटमध्ये अल्लाउद्दीनच्या लूकची प्रशंसा करतानासुद्धा दिसून आले आहेत.