American woman post on cost of dining in India Versus US goes viral marathi news : दिल्लीमध्ये राहणार्‍या एका अमेरिकन व्यक्तीने भारताबद्दल प्रेम व्यक्त करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये या महिलेने भारतात बाहेर जेवण करणे कसे परवडणारे आहे याबद्दल माहिती दिली आहे. क्रिस्टन फिशर नावाच्या या महिलेने भारत आणि अमेरिकेत रेस्टॉरंटमध्ये जेवणाच्या किमतीतील प्रचंड तफावत दाखवून दिली आहे.

तिने सांगितले की, भारतात १० डॉलरपेक्षा कमी किमतीत मिळणारे जेवण अमेरिकेत सुमारे १०० डॉलरला पडेल. तिच्या या पोस्टवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अनेकांनी भारत आणि अमेरिकेतील राहणीमानाचा खर्च यातील फरकाबद्दल सहमती दर्शवली आहे.

या व्हिडीओमध्ये फिशरने दाखवले की, एका स्थानिक रेस्टॉरंटमध्ये तिच्या सहा जणांच्या कुटुंबाने तीन स्टार्टर्स, तीन मेन कोर्सेस आणि डेझर्ट हे सगळं फक्त १० डॉलर्समध्ये विकत घेतलं. यामध्ये तिने अमेरिकेत टिपिंग कल्चरवर देखील टीका केली, ते खूपच अति असल्याचे तिने म्हटले आहे.

“अमेरिकेत हे कोणाच्या डोक्यातही येणार नाही. भारतात राहण्याबद्दल मला आवडणारी एक गोष्ट म्हणजे आम्हाला अमेरिकेत जेवढ्या वेळा जाता आले नसते, त्यापेक्षा खूप जास्त वेळा आम्ही रेस्टॉरंटमध्ये बाहेर जेवायला जाऊ शकतो. आमचं सहा जणांचं कुटुंब बाहेर जाऊ शकते आणि ३ स्टार्टर्स, ३ एन्ट्रीज आणि डेझर्ट हे सर्व १० डॉलर्स इतक्या कमी किमतीत ऑर्डर करू शकते. याच जेवणासाठी आमेरिकेत जवळपास १०० डॉलर्स द्यावे लागले असते. किमतीतील हा फरक पूर्णपणे अवाजवी आहे. आणि अमेरिकेतील टिपिंग कल्चरबद्दल तर बोलायलाच नको, कारण ते अगदी हाताबाहेर गेले आहे. भारतात राहणे मला आवडण्याची अनेक कारणे आहेक आणि हे निश्चितच त्यापैकी एक आहे,” असे तिने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी फिशरने केलेली तुलना योग्य असल्याचे म्हटले आहे.

एका युजरने कमेंट केली की, “आणि १०० डॉलर्स देऊनही जेवणाची चव आणि सर्व्हिसही बऱ्याचादा खूप चांगली नसते. याउलट, भारतात जबरदस्त स्पर्धा असल्याने साध्या तसेच फॅन्सी रेस्टॉरंट्समध्येही सहसा खूपच चांगले जेवण दिले जाते.”

दुसऱ्या एकाने म्हटलं की, “तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे! भारतात रेस्टॉरंटमध्ये जेवण करणं नक्कीच स्वस्त आहे! आणि टिप देणं देखील गरजेचं नसतं! सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मेनूमध्ये असलेली जेवणाची विविधता! नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन, इंडो-चायनीज इत्यादींसारखे अनेक पर्याय असतात आणि प्रत्येक पदार्थाची वेगळी खास चव आणि मसाल्याचे स्तर असतो.” दरम्यान या आधीच्या व्हिडीओमध्ये तिने अशा १० गोष्टी सांगितल्या होत्या ज्या भारतात आढळतात पण अमेरिकेत नाही.