Anand Mahindra on Indian womens gold holding : उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी गुरुवारी त्यांच्या लहानपणीची एक आठवण सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी १९६२ साली चीनबरोबर झालेल्या युद्धादरम्यान भारतीय नागरिकांमध्ये दाखवलेल्या उल्लेखनीय एकजुटीबद्दल महिंद्रा यांनी माहिती दिली आहे. एका सोशल मीडिया यूजरने जगातील इतर १० देशांतील महिलांकडे मिळून जेवढे सोने आहे, त्यापेक्षा जास्त सोने भारतीय महिलांकडे असल्याची पोस्ट केली होती. यानंतर आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणीला उजाळा दिला.

या पोस्टमध्ये दिलेल्या डेटानुसार भारतीय महिलांकडे पुढे देण्यात आलेल्या १० देशांपेक्षा जास्त सोने आहे

भारतीय महिला – २५४८८ टन

अमेरिका – ८१३३ टन

जर्मनी – ३,३५१ टन

इटली – २४५१ टन

फ्रान्स – २,४३७ टन

रशिया २३३२ टन

चीन – २२७९ टन

स्वित्झर्लंड – १०३९ टन

जपान ८४५ टन

नेदरलँड्स – ६१२ टन

पोलंड – ४४८ टन

या आकडेवारीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना महिंद्रा यांनी पोस्ट लिहिली आहे, ते म्हणाले की, “प्रभावी आकडेवारी. यामुळे माझी माझ्या लहानपणीची आठवण ताजी झाली.”

यानंlर पुढे त्यांनी १९६२ सालच्या युद्धादरम्यान राष्ट्रीय संरक्षण निधीसाठी सोने आणि दागिने गोळा करण्यासाठी राबवण्यात आलेल्या मोहिमेची आठवण सांगितली. ते म्हणाले “१९६२ मध्ये चीनबरोबर युद्ध सुरू असताना, सरकारने एक राष्ट्रीय संरक्षण निधी (National Defence Fund) तयार केला होता आणि संरक्षणाकरिता होणार्‍या कामासाठी नागरिकांना सोने आणि दागिने दान करण्याचे आवाहन केले होते. ऑनलाईन उपलब्ध माहितीनुसार, आजच्या किंमतीनुसार कोट्यवधी रुपयांचे सोने जमा झाले होते. एकट्या पंजाबने, सुमारे २५२ किलो सोन्याचे हातभार लावला होता.”

पुढे महिंद्रा म्हणाले की, “मला स्पष्टपणे आठवतं, सात वर्षाचा असताना, तेव्हा माझ्या आईबरोबर मुंबईतील (तेव्हाचे बॉम्बे) रस्त्यावर उभा होतो, जेव्हा मेगाफोन्स असलेले सरकारी ट्रक जवळून गेले, ते नागरिकांना देशाच्या संरक्षणासाठी दागिने दान करण्याचे आवाहन करत होते. मी आजही तिला शांतपणे तिच्या काही सोन्याच्या बांगड्या आणि नेकलेस गोळा करताना, ते कापडी थैल्यात ठेवताना आणि ते ट्रकमधील स्वयंसेवकांच्या हातात देताना पाहू शकतो.”

महिंद्रा यांच्या या पोस्टची सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर चर्चा होताना दिसत आहे. तसेच या पोस्टमुळे अशा प्रकारची मोहिम आजच्या काळात शक्य होईल का? याबद्दलही चर्चा होत आहे.

आजच्या जगात तेवढ्या मोठ्या प्रमाणात, मनोबल आणि विश्वासासह स्वयंसेवी कार्य होईल का? असा प्रश्न महिंद्रा यांनी पुढे विचारला आहे. १९६२ ची ती आठवण मला लक्षात आणून देते की, कोणत्याही देशाचा बळकटपणा (national resilience) शेवटी फक्त धोरणात्मक साधनांवर अवलंबून नसतो, तर तो त्याच्या लोकांच्या सामूहिक इच्छाशक्तीवर अवलंबून असतो, असेही महिंद्रा म्हणाले.