महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिद्रा यांनी आपल्या नावे व्हायरल होणाऱ्या एका फोटोवरुन संताप व्यक्त केला आहे. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन असणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी ट्वीटरला एक स्क्रीनशॉट शेअर केला असून हे पूर्पणणे बनावट असल्याचं सांगितलं आहे. याशिवाय त्यांनी सोबत दोन मिम्स शेअर करत नाराजी दर्शवली असून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारादेखील दिला आहे.
“एक सर्वसामान्य व्यक्ती अनेक दिवस सोशल मीडियावर महिलेचा पाठलाग करण्यात, स्पोर्ट्स टीमकडून अपेक्षा ठेवण्यात आणि काळजी नसलेल्या राजकारण्यांच्या हातात आपली स्वप्न सोपवण्यात घालवतो,” असं आनंद महिंद्रा यांनी म्हटल्याचा एक फोटो त्यांच्या नावे सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ट्विटरला आनंद महिंद्रा यांचे ८५ लाख फॉलोअर्स आहेत.
आनंद महिंद्रा यांनी स्क्रीनशॉट शेअर केला असून यामध्ये हा फोटो इंस्टाग्रामवरील “start_upfounder” या पेजवर अपलोड करण्यात आल्याचं दिसत आहे.
“माझ्या एका सहकाऱ्याने मला सांगितलं की इंटरनेटवर काहीजण विनाकारण तुमची बदनामी करत आहेत. माझ्या नावे अजून एक बनावट वाक्य देण्यात आलं आहे. मी कायदेशीर कारवाई करणार,” असं आनंद महिंद्रा यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान आनंद महिंद्रा यांनी उत्तर देण्यासाठी यापुढे आपण दोन मिम्स शेअर करणार असल्याचं सांगत सोबत ट्वीट केले आहेत.
आनंद महिंद्रा यांच्या ट्वीटवर अनेक युजर्सनी कमेंट केल्या आहेत.
याआधीही आनंद महिंद्रा यांनी सप्टेंबर महिन्यात अशाप्रकारे आपल्या नावे बनावट गोष्टी शेअर करणाऱ्यांविरोधात नाराजी सोशल मीडियावरील प्रसिद्धीची दुसरी बाजून असल्याचं म्हटलं होतं.