महिंद्रा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. ते सतत नवनवीन प्रेरणादायी व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करत लोकांमध्ये जगजागृती करण्याचा प्रयत्न करत असतात. नुकतंच त्यांनी उंच इमारतीला आग लागल्यानंतर सेफ्टी डिव्हाईसचा वापर कसा करायचा याबाबतची माहिती देणारा एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला होता.
अशातच आज त्यांनी पुन्हा एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो पाहून तुम्हालाही व्हिडीओतील मुलीचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओंमध्ये काही आपलं मनोरंजन करणारे तर काही व्हिडीओ आपणाला भावूक करणारे असतात. तर काही व्हिडीओ असे असतात जे पाहून आपणाला प्रेरणा मिळते. सध्या अशाच एका अपंग मुलीचा प्रेरणादायी व्हिडीओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये एक अपंग मुलगी आपल्या पायांच्या मदतीने एलईडी बल्ब बनवताना दिसत आहे. त्याच वेळी, पायांच्या मदतीने सोल्डरिंग करत वायर जोडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही त्या तरुणींच्या जिद्दीचं कौतुक कराल यात शंका नाही. व्हिडीओमध्ये दोन्ही हात नसलेली एक अपंग तरुणी आपल्या पायाच्या साहाय्याने एलईडी (LED) बल्ब कशी बनवत असल्याचं पाहायला मिळतं आहे.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर उद्योगपती आनंद महिंद्रांना तो व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्याचा मोह आवरता आला नाही. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे की, “देशात लघुउद्योग बदल घडवत आहेत. हे माझ्या विचाराच्या पलीकडचे आहे.” तर हा व्हायरल व्हिडिओ सर्वात आधी कुणाल गुप्ता नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर शेअर केला आहे.
त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की, डिजीएबल्ड (Digiabled) नावाची एक कंपनी ग्रामीण भागात अपंग लोकांच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवते आणि अपंग लोकाना सशक्त बनण्याची संधीही देते. तर हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी शेअर करताच नेहमीप्रमाणे अनेकांनी या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया दिल्या असून या व्हिडीओतील तरुणीचे अनेकांनी तोंडभरुन कौतुक केलं आहे.