Indian Young Lady Returns From US After Laid Off From Work Video Goes Viral: अनन्या जोशी ही भारतीय तरुणी पहिल्या नोकरीवरून काढण्यात आल्यानंतर नवी नोकरी न मिळाल्याने अमेरिका सोडून भारतात परतली आहे. २९ सप्टेंबर रोजी तिने अमेरिकेतून निघतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने अमेरिकेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि म्हटले की, हा देश सोडणे हे तिच्या प्रवासातील सर्वात कठीण पाऊल होते.
“अमेरिका सोडणे या प्रवासातील सर्वात कठीण पाऊल आहे. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र प्रौढ म्हणून अमेरिका हे माझे पहिले घर होते आणि ते माझ्यासाठी नेहमीच खास राहील. माझे अमेरिकेतील आयुष्य जरी थोडे असले तरी, अमेरिकेने मला दिलेल्या आयुष्याची मी खरोखर आदर करते. अमेरिका, आय लव्ह यू”, असे या तरुणीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
२०२४ मध्ये नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीमधून बायोटेक्नॉलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतलेल्या अनन्या जोशीने एफ-१० ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग प्रोग्रामद्वारे बायोटेक स्टार्टअपमध्ये नोकरी सुरू केली होती. अलीकडेच तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. यानंतर तिने अनेक महिने नोकरी शोधली पण तिला योग्य नोकरी मिळाली नाही. यामुळे तिने भारतात परतण्याचा निर्णय घेतला.
या तरुणीने चार महिन्यांपूर्वी लिंक्डइनवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, “ले ऑफचा भाग म्हणून मला माझ्या मागील कंपनीने नोकरीवरून काढून टाकले आहे. मी माझी पुढील संधी शोधत आहे. यासाठी थोडी घाई आहे कारण माझ्या विद्यार्थी व्हिसाची मुदत संपत आली आहे. अमेरिकेत राहण्यासाठी मला पुढील महिन्याच्या आत एखादी नोकरी मिळवणे गरजेचे आहे.”
पहिली नोकरी गमावल्यानंतर दुसरी नोकरी मिळावी यासाठी तरुणीने असंख्य प्रयत्न कले, पण तिला दुसरी नोकरी मिळू शकली नाही. ज्यामुळे तिने अमेरिका सोडून इतरत्र नवीन संधी शोधण्याचा निर्णय घेतला.
एफ-१ ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग प्रोग्राम व्हिसावर अमेरिकेत राहणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाच्या क्षेत्रात १२ महिन्यांपर्यंत तात्पुरती नोकरी करण्याची परवानगी मिळते.