तेजबहादूर यादव हे नाव आतापर्यंत सगळ्यांनाच माहिती झालंय. बीएसएफच्या या जवानाने त्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधांबद्दल व्हिडिओ तयार करत खळबळ माजवली होती. जवानांना दिल्या जाणाऱ्या अन्नापासून इतर सोयीसुविधांमध्ये कमालीची कमतरता असल्याचं यादव यांनी या व्हिडिओमधून म्हटलं होतं. त्यांनी हा व्हिडिओ फेसबुकवर टाकताच सगळीकडे खळबळ उडाली होती.

आता याच तेजबहादूर यादवना लष्करी सेवेतून काढून टाकण्यात आलंय. यादव यांची गेले महिनाभर चौकशी सुरू होती. आणि या चौकशीमध्ये शिस्तभंगाचं कारण देत त्यांना सेवेतून कमी करण्यात आलंय. याविरोधात ट्विटरवर लोकांनी आपला राग व्यक्त केलाय.

१. ‘एवढी असहिष्णुता का?’

२. ‘सेनेची प्रतिमा सैनिकांना मिळणाऱ्या खराब डाळीमुळे झाली, तेजबहादूर यादवांमुळे नाही’

३. ‘भारतात अभिव्यक्तिस्वातंत्र्य उरलंय का?’

४. ‘माझ्या देशात खायला चांगलं अन्न मागणारा जवान बडतर्फ होतो.  खरंच माझा देश पुढे जातोय’

यादव यांच्या या व्हिडिओनंतर बीएसएफ आणि लष्कराच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी जाहीर प्रतिक्रिया दिल्या होत्या. सैनिकांच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी थेट माझ्याशी बोलावं असं लष्करप्रमुखांनी जाहीररित्या सांगितलं होतं. पण बीएसएफच्या अपुऱ्या सोयीसुविधांना वाचा फोडणाऱ्या तेजबहादूर यादवांची बरीच फरफट झाली. फेसबुकवर  त्यांचे पाकिस्तानी ‘फ्रेंडस्’ असल्याची बतावणी केली गेली. आणि सरतेशेवटी बुधवारी त्यांना सेवेतून कमी करण्यात आलं. आता त्यांना पेन्शनही मिळणार नाही.

देशासाठी लढणाऱ्या आणि मूलभूत सोयीसुविधा मिळण्यासाठी झगडणाऱ्या तेजबहादूर यादव यांच्यासारख्या जवानांची हीच गत होणार असेल तर या जवानांचं मनोधैर्य खच्ची होणार नाही का? हाच सवाल आता महत्त्वाचा ठरतोय.