अमेरिकेमध्ये फिरायला आलेल्या तीन पर्यटकांना काही चोरट्यांचा सामना करावा लागला आहे. अमेरिकेतील चेल्सी रोडवरून जात असताना त्यांच्यावर चोरांच्या सशस्त्र टोळीने हल्ला करून जवळपास ९२ लाखांचं घड्याळ चोरण्याचा प्रयत्न केला. यावेळी हे चोर आपला चेहरा लपवून आले होते. हल्ला झालेल्या तिघांमध्ये पिता-पुत्राचा समावेश होता. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की काही लोकांवर एका टोळीने हल्ला केला आहे. त्यांच्याकडे काही शस्त्रही आहेत. त्यातील एक माणूस मुलाला जमिनीवर ढकलतो आणि बंदूक दाखवून त्याच्याकडून त्याचे रोलेक्सचे घड्याळ मागतो. या घड्याळाची किंमत तब्बल १ लाख पाउंड म्हणजेच जवळपास ९२ लाख रुपये सांगण्यात येत आहे. यावेळी मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वडिलांवरही चोरांनी चाकूने हल्ला केला. मात्र, सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही. दरम्यान, तिसऱ्या महिलेचे २०० पाऊंडचे घड्याळ चोरीला गेले. या महिलेला चोरांनी स्टॅन गनची धमकी देऊन हे घड्याळ हिसकावले.
चार मुलांची आई पडली प्रेमात; पतीला कळत्याच त्याने ‘करवा चौथ’च्या दिवशीच…
चोरी केल्यानंतर या टोळीने आपल्या वाहनातून पळ काढला. या घटनेनंतर पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास सुरु केला. काही काळातच मेट्रोपॉलिटन पोलिसांचे फ्लाइंग स्क्वॉड आणि वेस्टमिन्स्टर रॉबरी स्क्वॉड यांच्या संयुक्त तपासणीनंतर दरोडेखोरांचा शोध लागला.
दरम्यान, अनेक सीसीटीव्ही कॅमेरे आणि मोबाईल फोनमध्ये ही घटना कैद झाली आहे. चोरी करताना या टोळीने तोंड झाकले होते आणि जेनेरिक कपडे घातले होते म्हणून त्यांची ओळख पटू शकली नाही. अहवालानुसार, ही टोळी चोरी केलेली जग्वार F-PACE वापरत होती. गाडीच्या खोट्या नेम प्लेटमुळे पोलिसांना त्यांचा शोध घेणे कठीण झाले होते. मात्र, कारवर असलेल्या एका लहानशा स्टिकरच्या मदतीने पोलिसांना तपासात मदत झाली.
पोलिसांना या कारच्या विंडशील्डच्या तळाशी उजव्या कोपऱ्यात एक लहान स्टिकर सापडला. याबद्दल अधिक तपास केला असता, जवळपास ३० ते ४० जग्वार कारमध्ये हे स्टिकर असल्याचे त्यांना आढळले. यानंतर त्यांनी प्रत्येक कारच्या मालकाला चौकशीसाठी बोलावले. यानंतर एका मालकाने पोलिसांना सांगितले की त्यांच्या मुलाच्या शाळेमधील पार्किंगसाठी त्यांच्याकडे कारचे परमिट आहे. हे परमिट त्या स्टिकरला मॅच झाले. अशाप्रकारे पोलिसांनी या चोरांचा शोध लावला.