Ashneer Grover EY story: ईवाय (अर्न्स्ट ॲण्ड यंग) या कंपनीच्या पुण्यातील कार्यालयात कार्यरत ॲना सॅबेस्टियनचा २० जुलै रोजी मृत्यू झाला. कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा दावा तिच्या आईने केल्यानंतर केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने देशभरात कथित असुरक्षित आणि शोषणयुक्त कामाच्या वातावरणाची चौकशी करण्याचे संकेत दिले. यानंतर अनेकांनी कामाच्या ठिकाणी असणाऱ्या तणावाबाबत आपापली मते व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. भारत पे कंपनीचे सहसंस्थापक आणि शार्क टँक या कार्यक्रमामुळे लोकप्रिय झालेले अशनीर ग्रोवर यांनीही त्यांचा या कंपनीतील कामाचा अनुभव कथन केला होता. त्यांचा एक जुना व्हिडीओ आता पुन्हा व्हायरल होत आहे. प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

शार्क टँक इंडियाचे परीक्षक असताना अशनीर ग्रोवर यांचा “ये सब दोगलापण है”, हा डायलॉग चांगलाच प्रसिद्ध झाला होता. या डायलॉग प्रमाणेच त्यांची बोलण्याची बिनधास्त शैली आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी ईवाय कंपनीत नोकरी लागल्यानंतर पहिल्या दिवसाचे वर्णन केले आहे. ते म्हणाले, “पहिल्या दिवशी जेव्हा मी कार्यालयात गेलो, त्यानंतर मला जे दिसले, ते पाहून धक्काच बसला. मग मी छातीत दुखायला लागलो असे सांगितले आणि तिथून पळ काढला. तिथे अक्षरशः मरनासन्न अवस्थेत आलेले कर्मचारी पाहून मला वाईट वाटले. असे वाटत होते की, तिथे मृतदेह पडले आहेत आणि त्यांचे फक्त अंत्यसंस्कार करायचे बाकी राहिलेत.”

हे वाचा >> EY Employee Death : कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झालेल्या तरुणीच्या आईसाठी कंपनीच्या अध्यक्षांचं पत्र, म्हणाले, “मी ही एक बाप…”

मला एक कोटी पगार आणि भागीदारी मिळाली होती

“जिथे भांडणे होतात ना, ते ठिकाण काम करण्यासाठी चांगले असते. काहीजण या वातावरणाला टॉक्सिक कल्चर म्हणतात. पण काम तर तिथेच होते, बाकी नॉन टॉक्सिक कल्चरचे खूप कार्यालय बघायला मिळतात”, असेही ग्रोवर पुढे म्हणाले आहेत. तसेच ईवायमध्ये काम करण्यासाठी मला एक कोटी रुपये पगार आणि भागीदारी मिळाली होती, असेही ग्रोवर यांनी सांगितले.

हे ही वाचा >> EY Employee Death : कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झालेल्या ॲनाच्या वडिलांची प्रतिक्रिया; म्हणाले, “ती रात्री साडेबारापर्यंत…”

अशनीर ग्रोवर यांच्यावरही टीका

दरम्यान ईवायमधील परिस्थिती सांगतानाच ग्रोवर यांनी कामाच्या ठिकाणी भांडणे असावीत आणि टॉक्सिक कल्चरची भलामण केली आहे. त्यामुळे त्यांच्यावरही टीका होत आहे. अब्जाधीश आणि प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून टॉक्सिक कल्चरचे समर्थन करणे योग्य आहे का? असा प्रश्न विचारला आहे. तसेच त्यांनी या कॅप्शनसह ॲना पेरायिलच्या नावाचा हॅशटॅगही दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हर्ष गोयंका यांच्या एक्सवरील पोस्टला आतापर्यंत साडे तीन लाख लोकांनी पाहिले असून दोन हजाराहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. तर अनेकांनी कामाच्या ठिकाणी तणावाबाबतची मते मांडली आहेत.