Auto Fare : एका प्रवाशाने रेडइट या समाजमाध्यमावर एक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट तुमच्या आमच्या दैनंदिन आयुष्याचा भाग असलेल्या रिक्षेबाबत आहे. रिक्षा करावी लागणं हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला आवश्यक भाग झाला आहे. स्टेशनला जाणं असेल, इच्छित स्थळी लवकर पोहचणं असेल आपण रिक्षेचा पर्याय सहज निवडतो. गेल्या काही वर्षांपासून उबर, ओला आणि खासगी रिक्षांची सेवाही आपल्याला मोबाइल अॅपद्वारे मिळते. दरम्यान एका प्रवाशाला आलेला अनुभव त्याने रेडइटवर शेअर केला आहे.
काय आहे प्रवाशाची पोस्ट?
बंगळुरुतला हा युजर म्हणतो, इथे पाऊस पडत होता म्हणून उबर या अॅपवर मी रिक्षा बुक करु पाहतो आहे तर १ किमी अंतरासाठी मला ४२५ रुपये दाखवत आहेत. जर १ किमी अंतर जाण्यासाठी मी कॅबचा म्हणजेच टॅक्सीचा पर्याय निवडला तर मला ३६४ रुपये दाखवत आहेत. जवळचं अंतर जाण्यासाठी हे दोन्ही प्रवास खिशाला परवडण्याजोगे नाहीत. काल रात्री खूप पाऊस पडत होता. त्यामुळे माझ्या मित्राने ऑटो बुक केली. त्यावर दाखवलं जाणारं रिक्षा किंवा टॅक्सी यांचं भाडं पाहून तो चक्रावूनच गेला. त्याने छत्री घेतली आणि तो चालत घरी गेला.” अशी पोस्ट एका प्रवाशाने लिहिली आहे. जी चांगलीच व्हायरल झाली आहे.
नेटकरी या पोस्टबाबत काय म्हणत आहेत?
एका युजरने म्हटलं आहे, जर्मनीत तुम्हाला मर्सडीज बेंझ कॅबने जायचं असेल तर इतकं भाडं १ किमीसाठी आकारतात. तर दुसऱ्या एकाने म्हटलं आहे स्वतःची रिक्षा घेण्याची हीच ती वेळ आहे. आणखी एक युजर म्हणतो इतकं भाडं अमेरिकेत लागतं, भारतातही लागू लागलं आहे. तर चौथा युजर म्हणाला की रस्त्यांची जी काही कामं आहेत त्यात रिक्षा किंवा टॅक्सीने जाण्यापेक्षा चांगला पर्याय तुझ्या मित्राने निवडला तो म्हणजे तो छत्री घेऊन चालत घरी गेला. उत्तम पर्याय.
बंगळुरुत रिक्षा आणि टॅक्सी यांची सद्यस्थिती काय आहे?
प्रवाशाला आलेला हा अनुभव विचारात घेतला तर ही स्थानिक वाहतुकीची परिस्थितीही फारशी वेगळी नाही. बंगळुरुमध्ये खासगी अॅप वगळता जी स्थानिक सेवा पुरवली जाते त्या रिक्षा आणि टॅक्सी सेवेचे दरही गगनाला भिडलेले आहेत. बंगळुरुत आयटी आणि वाढतं औद्योगिकरण यामुळे रोज रस्त्यांवर लाखो वाहनं दिसतात. अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी या समस्या बंगळुरुतही आहेतच. त्यामुळे रोजचं आयुष्य आणि त्यातून या सगळ्या कोंडीतून वाट कशी काढायची हा प्रश्न बंगळुरुकरांपुढे असतोच. अशात पावसात कॅब आणि रिक्षा यांची भाडी गगनाला भिडतात. प्रवाशाची पोस्टही हेच सांगते आहे.