शेतात उस खात असताना पकडल गेल्यानंतर विजेच्या खांबामागे उभं राहून लपण्याचा हत्तीच्या पिल्लाचा केविलवाणा पण तितकाच गोंडस प्रयत्न सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. थायलंडच्या चेंग माई या डोंगररांगातील भागांत उसशेती केली जाते. रात्री हत्तीचं पिल्लू उसाच्या शेतात शिरुन मजेत उस खात होतं. यावेळी त्या भागातील काही नागरिकांनी शेताच्या दिशेने बॅटरी फिरवल्यावर हत्तीच्या पिलाची चोरी उघडकीस आली.

थायलंडमधील एका स्थानिक व्यक्तीने हत्तीच्या पिलाची हा प्रयत्न सोशल मीडियावर टाकला आहे. शांत रहा, पोलीस पाहतील आपल्याला…नंतर उस खाऊ अशा आशयाचं कॅप्शन देत हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.

फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकरीही या छोट्याश्या हत्तीच्या प्रेमात पडले आहेत.

थायलंडमध्ये हत्तींची संख्या मोठी आहे. यातले काही हत्ती हे जंगली आहेत तर काही ठिकाणी हत्तींना पाळलंही जातं. हत्तींच्या संरक्षणासाठी थायलंडमध्ये कायदा करण्यात आला असून त्याचं उल्लंघन झाल्यास आरोपीला मोठा आर्थिक दंड आणि कारावासाची शिक्षाही होते.