Baby Elephant Uses Dustbin Viral Video :हत्ती अत्यंत हुशार आणि भावनाशील प्राणी आहेत हे अनेकदा व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधून सिद्ध झाले आहे. हत्तीची हुशारी सिद्ध करणारा असाच एक व्हिडिओ पुन्हा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर एका गोंडस हत्तीच्या पिल्लाचा कचरा कचरापेटीमध्ये टाकतानाचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. एका छोट्या हत्तीने कचरा उचलून तो नीटपणे कचरापेटीत टाकून त्याच्या शिस्तीने सर्वांचे मन जिंकले आहे.
कचऱ्याची समस्या किती मोठी आहे हे आपणा सर्वांनाच माहित आहे. प्लास्टिकच्या कचऱ्याचे किती वाईट परिणाम होत आहे हे दिसत असूनही अनेक बेशिस्त लोक अजूनही रस्त्यावर कचरा टाकतात. कचऱ्याची समस्या कमी करण्याऐवजी ती वाढवत आहे. वारंवार सांगूनही माणसांना शिस्त लागत नाही. आजही लोक थेट रस्त्यावर प्लास्टिकच्या बाटल्या किंवा चिप्सचे पॅकेट टाकताना दिसतात. मुक्या प्राण्यांना माणसापेक्षा जास्त समजूदारपणा दाखवतात.
या व्हिडिओमध्ये हत्तीचे पिल्लू आपल्या आईबरोबर रस्त्यावर चालताना दिसत आहे. रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा दिसताच हत्तीचे पिल्लू आपल्या सोंडेने तो उचलतो आणि जवळच असलेल्या कचरापेटीत नीट टाकतो. एवढेच नव्हे तर तो हे करताना शांतपणे आणि समंजसपणे वागत असल्याचे पाहायला मिळते. व्हिडिओ पाहून अनेकांना विश्वास बसला नाही तर अनेक जण थक्क झाले. हत्तीची हुशारी पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले. हा व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क झाले पण त्याचबरोबर अनेकांना आपल्या सवयींचा पुनर्विचार करायला भाग पाडले आहे. हत्तीच्या पिल्ला जे समजते ते मानवाला का समजत नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
व्हिडिओवर राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया:
बीजेपी नेते आणि कर्नाटकचे माजी मंत्री सी.टी. रवी यांनी हा व्हिडिओ ‘एक लहान हत्ती कचरापेटीवापरू शकतो, मग आपण का नाही?’ अशा कॅप्शनसह शेअर केला.
नेटकऱ्यांची प्रतिक्रिया:
एका युजरने लिहिले, “हत्ती देखील आपल्या कचर्याचा परिणाम टाळू शकत नाहीत. या छोट्या हत्तीने माणसांना दिलेला संदेश अप्रतिम आहे.” दुसऱ्याने लिहिले, “हत्तीने कचरा कचरापेटीमध्ये टाकला आणि माणसं अजूनही कारमधून चिप्सच्या पाकिटांचा कचरा बाहेर फेकतात. मग खरा प्राणी कोण?”
काहींनी याला “शिस्त आणि संवेदनशीलतेचा संगम” असे म्हटले, तर काहींनी या हत्तीच्या पिल्लाचे नागरिक भावनेचे कौतुक केले.
पण, काही लोकांनी या व्हिडिओच्या सत्यतेबद्दल शंका व्यक्त केली आणि तो AI-जनरेटेड असण्याची शक्यता व्यक्त केली. मात्र, व्हिडिओ खरा असो किंवा खोटा त्याने दिलेला संदेश स्पष्ट आहे – प्राणीही कचरा योग्य ठिकाणी टाकतात, मग आपण का नाही?