लहान मुलांना आपल्या आजुबाजूला काय सुरु आहे याचं भान नसतं, त्यांचं विश्व हे केवळ खेळण्यापुरते मर्यादीत असतं. तसंच आपल्या आवडीचे कार्यक्रम पाहत बसण्याचं त्यांना खूप वेड असतं. एखादा आवडीचा कार्यक्रम टीव्ही किंवा मोबाईलवर मुलांना लावून दिला तर त्यांना खाण्या-पिण्याचं भानही राहत नाही, अशा अनेक चिमुकल्यांना तुम्ही पाहिलं असेल. शिवाय सध्याच्या लहान मुलांना सर्वात जास्त पाहायला आवडतं ते म्हणजे डोरेमॉन, मोटू-पतलू, छोटा भीम यासारखे कार्टून्स हे पाहण्यात ते रमून जातात.
हेही पाहा- Video: बहिणीच्या नवऱ्यासोबत मेहुणीने केलेल्या डान्सची नेटकऱ्यांना भूरळ; म्हणाले, ‘आमची नजरच हटेना…’
लहान मुलांना या कार्टून्सच वेड असतं याबाबत कोणाचं दुमत नाही. मात्र, सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कारण, डोरेमॉनचा आवाज ऐकून एका गर्भवती महिलेच्या पोटातील बाळ चक्क किक मारत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतं आहे. त्यामुळे लहान मुलांना डोरेमॉनचं वेड लागतं ते माहिती होतं पण आता चक्क पोटातील बाळांनाही त्याचं वेड लागलं की काय? अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.
सोनल कौशल या वॉइस आर्टीस्टने हा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. शिवाय सोनलचा आवाज डोरेमॉन या पात्राला दिला असून तिच्या आवाजानेच डोरेमॉन ओळखला जातो. अशातच ती आपल्या प्रोजेक्टचं काही काम करत असताना, डोरेमॉनचा आवाज येताच तिच्या पोटातील बाळ ॲक्टिव्ह झाल्याचं तिला जाणवलं. तिने लगेच या घटनेचा व्हिडीओ शूट केला असून या व्हिडीओमध्ये ती कॅमेरा पोटाकडे दाखवते आणि डोरेमॉनचा आवाजात बोलायला सुरुवात करते. ती जशी डोरेमॉनचा आवाज काढते त्यावेळी तिच्या पोटातील बाळ पोटात लाथ मारत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं आहे.
हा व्हिडिओ तिने एक आठवड्यापूर्वी इंस्टाग्रामवर शेअर केला असून तेव्हापासून हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे. शिवाय हा व्हिडीओ आत्तापर्यंत जवळपास ८ मिलियन लोकांनी पाहिला आहे. तर त्याला ८० हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओला छान छान कमेंट केल्या आहेत, एकाने ‘तुमचे मूल भाग्यवान असेल, तुम्ही आमचे बालपण छान केले आहे. तर ‘व्वा, आईच्या पोटात डोरेमॉनचा चाहता आहे.’, हे बाळ खूप आनंदी आहे कारण त्याच्याकडे स्वतःचे डोरेमॉन आहे’, ‘अरे, खूप गोंडस, कदाचित आतमध्ये लहान डोरेमॉन असेल, अशा गमतीशीर कमेंटदेखील या व्हिडीओखाली अनेकांनी केल्या आहेत.