सारे भारतीय माझे बांधव आहेत, भारताच्या प्रतिज्ञेतील हे वाक्य आठवतंय का? याची प्रचिती देणारा एक सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशातील एका बेकरीने आई वडील नसलेल्या अनाथ लेकरांसाठी एक खास ऑफर आणली आहे. आयएएस अवनीश शरण यांनी सोशल मीडियावर या ऑफरचा एक फोटो शेअर केला होता, जो सध्या सोशल मीडियावर अनेकांची प्रशंसा मिळवत आहे. ज्यांचे आई वडील नाहीत अशा मुलांसाठी वर्षातील कुठल्याही दिवशी ही बेकरी फ्री मध्ये केक देऊन एक वेगळाच पायंडा रचत आहे.

आयएएस अविनाश यांनी हा फोटो शेअर करताना या दुकानाच्या मालकाला खूप सारे प्रेम असे कॅप्शन दिले आहे. प्राप्त माहितीनुसार या बेकरी मध्ये आई वडील नसलेल्या ०-१४ वर्षाच्या वयोगटातील लहानग्यांना मोफत केक दिला जाणार आहे. या फोटोवर कमेंट करून काहींनी ही उत्तर प्रदेशातील देवरिया येथील बेकरी असल्याची माहिती दिली आहे.

….तर मोफत केक मिळणार

दरम्यान हे ट्विट सध्या सोशल मीडियावर बरेच चर्चेत आहे. याला २५ हजारहून अधिक युजर्सनी लाइक केले आहे तर २००० हुन अधिक जणांनी हा फोटो रिट्विट केला आहे. आयुष्यात वाढदिवसाचा केक कापणे ही नेहमी लक्षात राहणारी सुंदर आठवण असते मात्र ज्यांचे आई वडील नसतात त्यांना दुर्दैवाने हे सुख मिळतेच असे नाही त्यामुळे अशा मुलांना हा आनंद द्यावा म्हणून ही ऑफर दिलेली असावी पण यातुन भारतात अजूनही माणुसकी जिवंत आहे हे दिसून येतेय असे अनेक युजर्स या फोटोवर कमेंट करून म्हणत आहेत.