पश्चिम बंगालमधील एका दुर्गा पूजा मंडळाने या राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या प्रतिकृतीची आपल्या मंडळात दुर्गा म्हणून स्थापना केली आहे. दशभूजेतील त्यांच्या या मुर्तीची पश्चिम बंगालच काय पण संपूर्ण देशभर चर्चा आहे.
३ दशकाहून अधिक काळ पश्चिम बंगालमध्ये असलेली डाव्यांची सत्ता उलथवून त्या दुस-यांदा मुख्यमंत्री झाल्या. बंगालमध्ये सगळेच त्यांना आदराने ‘दिदी’ या नावाने हाक मारतात. त्यांच्या आदरार्थ ‘प्रांतिक क्लब’ने आपल्या मंडळात ममता यांची दुर्गा म्हणून स्थापना केली आहे. पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेला खूप महत्त्व आहे. नऊ दिवसांत दुर्गेची मोठ्या भक्तीभावाने येथे पूजा केली जाते. त्यामुळे दुर्गा देवींच्या भव्य मुर्त्या आणि मंडळाची सजावट हा आकर्षणाचा विषय असतो.
‘प्रांतिक क्लब’ने ममता बॅनर्जी यांची साडेपाच फुटांची प्रतिकृती बनवली आहे. पांढरी साडी, पायात चपला आणि हात जोडून सगळ्यांना नमस्कार करणा-या ममता यांच्या प्रतिकृतीला १० हात देखील दाखवले आहे. गेल्या पाच वर्षांत ममता बॅनर्जी यांनी राबवलेल्या प्रत्येक योजना त्यांच्या दशभूजांमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. या प्रतिकृतीच्या मागे लावण्यात आलेल्या पडद्यावर पश्चिम बंगालचा नकाशाही रेखाटला आहे.