स्वत:चं घर घेण्याइतकंच भाड्याने घर मिळवणं हेही कठीण काम असतं. कारण इथे इतर सर्व बाबींसोबतच तुम्हाला घरमालकाशीही जुळवून घेणं आवश्यक असतं. बंगळुरूमध्ये भाड्याने घर शोधणाऱ्या काही तरुणांना आणि विद्यार्थ्यांना असाच काहीसा अनुभव आला आहे. इथल्या घरमालकांनी या तरुणांसमोर असे काही निकष ठेवले की सगळेच चक्रावून गेले. यातल्या अनेक ‘इच्छुक’ भाडेकरूंनी आपला अनुभव ट्विटरवर शेअर केला आहे. काहींनी तर घरमालकांचे निकष ऐकून ‘तुम्हाला भाडेकरू हवाय की जावई?’ असा खोचक प्रश्न करत घरमालकांचीच शाळा घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका ऑस्ट्रेलियन कंपनीमध्ये काम करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरचं व्हॉट्सअॅप चॅट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चॅटमध्ये ब्रोकर त्याला घरमालकाच्या अपेक्षा सांगत असल्याचं दिसत आहे. यानुसार ब्रोकरनं या तरुणाला त्याची शैक्षणिक पार्श्वभूमी विचारल्यार आपण वेल्लेरच्या व्हीआयटीमधून पदवी घेतल्याचं तरुणानं त्याला सांगितलं. मात्र, त्यावर ब्रोकरनं ‘तुम्ही घरमालकाच्या निकषांमध्ये बसत नाहीत’, असं म्हणून प्रस्ताव नाकारला. याचं कारण विचारताच तरुणाच्या शैक्षणिक पार्श्वभूमीचं कारण देण्यात आलं. ‘घरमालकाला आयआयटी, आयआयएममधून पदवी घेतलेल्या व्यक्तींनाच भाड्याने घर द्यायचं आहे’, असं उत्तर तरुणाला मिळालं.

अन् लग्नाच्या विधीदरम्यान नवरदेवानं केलं ऑफिसचं काम! फोटो व्हायरल होताच नेटकरी म्हणाले, “वर्क फ्रॉम होम…”

हा स्क्रीनशॉट ट्विटरवर व्हारल झाल्यानंतर त्यावर इतरही नेटिझन्सनी आपापले अनुभव शेअर करायला सुरुवात केली. अर्णब गुप्ता नावाच्या एका व्यक्तीने सांगितलं की “मी बंगळुरूला शिफ्ट होत असताना एका घरमालकानं माझ्याकडे माझं लिंक्ड इन प्रोफाईल मागितलं. हे कोणत्या दर्जाचं वर्तन आहे?” अशी विचारणा त्याने केली.

अंकित नावाच्या दुसऱ्या ट्विटर युजरनं त्यावर “मला वाटलं हे फक्त माझ्याच बाबतीत होतंय”, असं म्हणत त्याला दुजोरा दिला.

कपिल चावला नावाच्या युजरने या सगळ्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना “घरमालकांना खरंतर जावई हवा आहे”, असं खोचक ट्वीट केलं.मनीष नावाच्या व्यक्तीनेही अशाच प्रकारचं ट्वीट केलं.

काही नेटिझन्सनी मात्र यावर तटस्थ भूमिका देताना घरमालकांच्या मागणीचं समर्थन केलं आहे. ही फक्त भाडेकरूच्या पार्श्वभूमीबाबत व्हेरिफिकेशन करण्याची पद्धत असावी, काही देशांमद्ये तर नोकरी करत असलेल्या कंपनीचं पत्र, याआधीच्या घरमालकाचा संपर्क क्रमांक, डिटेल्स मागितले जातात असंही काही नेटिझन्स म्हणत आहेत. पण एकूणच बंगळुरूमधील भाड्याच्या घरांचा शोध सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bengluru landlord iim iit background tenants netizens says the want son in law pmw
First published on: 27-11-2022 at 10:01 IST