युरोपमधल्या सगळ्यात मोठ्या रोलरकोस्टरवर बसून थ्रील अनुभवण्याची मज्जा काही औरच ना! पण समजा यावेळी जर एखादी अनपेक्षित घटना घडली आणि तुम्ही किंवा तुमच्या शेजारी बसलेला एखादा जखमी झालाच तर तुम्ही काय कराल? आराडाओरडा कराल? सारी मज्जा, सारं थ्रील बाजूला ठेवून आपल्याला नक्की किती आणि कुठे लागलंय याची काळजी करत बसाल? हो ना? पण हा माणूस सगळ्यांपेक्षा वेगळा आहे बुवा! आता आपण थ्रील अनुभवायला जगातल्या सगळ्यात मोठ्या रोलरकोस्टरवर आलोच आहोत तर  छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी करून मूड खराब करण्यापेक्षा  मज्जाच अनुभवूयात ना असा फंडा याचा दिसतोय म्हणूनच की काय याचा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे.

रोलरकोस्टरच्या पहिल्या सीटवर सुटमध्ये दोघेजण बसले आहेत. यावरचे वाहन ताशी १०० किलोमीटरपेक्षाही अधिक वेगाने धावत असताना सगळ्यात पुढे बसलेल्या या व्यक्तीला आकाशात उडणा-या पक्ष्याची जबरदस्त धडक बसते. तो पटकन या पक्ष्याला बाजूलाही करतो. पण नंतर लक्षात येतं की हा पक्षी अजूनही आपल्या खांद्यावर आहे आणि आपल्या गळ्यातून रक्त येत आहे. ते पाहून काही मिनिटे तो घाबरतोही पण थ्रील अनुभवायची झिंग अशी काही त्याच्यावर चढली असते की याकडे दुर्लक्ष करत तो सारी मज्जा अनुभवतो. शेवटी काय आयुष्यात छोटे मोठे अपघात तर होतच असतात म्हणून का त्याक्षणी मिळणारा आनंद बाजूला ठेवायचा काय? असंच जणू हा माणूस आपल्या कृतीतून सांगतोय.