Black Panther and Leopard Video : ब्लॅक पँथर आणि बिबट्या हे जगातील सर्वांत धोकादायक प्राण्यांमध्ये गणले जातात. त्यामुळे या दोन्ही प्राण्यांना एकत्र पाहण्याची संधी मिळणे ही फार दुर्मीळ गोष्ट आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात ब्लॅक पँथर आणि दोन बिबटे मध्यरात्री एका मोकळ्या रस्त्यावरून चालताना दिसत आहेत, ज्याचे भयावह दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
या व्हिडीओतील हे दुर्मीळ दृश्य तमिळनाडूतील निलगिरी टेकड्यांवरील १६ जुलै रोजी पहाटे २ वाजतानाचे आहे. त्यामध्ये ब्लॅक पँथर इतर दोन बिबट्यांसह रस्त्यावर फिरत आहे. हा क्षण रस्त्याच्या कडेला लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनीही सांगितलेय की, ब्लॅक पँथर आणि बिबट्या एकत्र पाहायला मिळणे खूप दुर्मीळ आहे.
या व्हायरल व्हिडीओतून तीन वेगवेगळ्या अँगलमधील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत, ज्यामधून ब्लॅक पँथर आणि दोन बिबट्यांची प्रत्येक हालचाल टिपण्यात आल्याचे दिसतेय. पहिल्या अँगलमधील दृश्यात तिन्ही प्राणी रस्त्यावर येताना दिसतात, तर दुसऱ्या अँगलमधून या प्राण्यांचे सर्वांत जवळचे दृश्य टिपले गेले आहे. दुसऱ्या अँगलमधून घेतल्या गेलेल्या दृश्यात प्राण्यांचे सौंदर्य दिसून येतेय आणि तिसऱ्या अँगलमधील दृश्यात ते एकमेकांकडे कसे पाहतात आणि झुडपातून कसे दिमाखाने चालतायत ते दिसते आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ एक्सवर @ParveenKaswan वरून शेअर करण्यात आला आहे. अनेक सोशल मीडिया अकाउंट्सवरही हे फुटेज शेअर करण्यात आले आहेत. त्यावर लोकांनीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एकाने लिहिलेय की, असे दिसतेय की, ते काही महत्त्वाच्या मोहिमेवर आहेत. दुसऱ्याने म्हटलेय की, ही एक घट्ट मैत्री आहे, जी एकत्र शिकार करायला जात आहे.
दरम्यान, निलगिरी हा पश्चिम घाटाचा एक भाग आहे, जे युनेस्कोचे जागतिक वारसास्थळ आहे. जिथे सिंह, बिबट्यांसह अनेक वन्य प्राण्यांचा मुक्त संचार पाहायला मिळतो.