लग्नसंस्था अडचणीत आल्याची अनेक उदाहरणे आपल्या समाजात घडत असतात. फक्त भारतातीलच नव्हे तर जगभरातील लग्नासंबंधी अडचणी उद्भवत आहेत. मध्य चीनमध्ये एक विचित्र प्रकार घडल्याचे समोर आलं आहे. एक तरूणीनं लग्नाच्या एक महिन्याआधी लग्न मोडलं. फक्त एवढचं नाही तर होणाऱ्या नवऱ्याला एकदा मिठी मारली होती, त्यासाठी मुलीनं चार लाख रुपये भरपाई मागितली. या तरूणीच्या अजब मागणीवर चीनमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

सदर जोडपच्या ओळख मागच्या वर्षी एका विवाह संस्थेच्या माध्यमातून झाली होती. जानेवारी महिन्यात त्यांचा साखरपुडा झाला. नोव्हेंबर महिन्यात त्यांचे लग्न होणार होते. यासाठी हॉटेल बुकिंग करण्यात आले. प्री-वेडिंग फोटोशूटही करण्यात आले.

याशिवाय चीनमध्ये अनेक भागात लग्नाआधी वर कुटुंबाकडून वधू कुटुंबाला लग्नाची भेट म्हणून दोन लाख युआन (भारतीय चलनात सुमारे २५ लाख रुपये) देण्याची पद्धत आहे. एवढी रक्कम देऊनही सदर मुलीने लग्नाच्या आठवड्याभरापूर्वी लग्न न करण्याचा निर्णय घेतला.

होणार नवरा प्रामाणिक आणि गरीब

चीनमधील हेनन टीव्हीने दिलेल्या बातमीनुसार, सदर तरूणीने लग्न जुळविणाऱ्या संस्थेला सांगितले की, तिचा होणारा नवरा खूपच प्रामाणिक आहे आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवतही आहे. तसेच होणाऱ्या नवऱ्याच्या कुटुंबियांनी दिलेली आर्थिक स्वरुपातील भेट तिने परत देण्याचे मान्य केले. मात्र यासाठी तिने एक विचित्र अट ठेवली.

मिठीसाठी मागितले ४ लाख

प्री-वेडिंगच्या फोटोशूटदरम्यान जोडप्यांना एकमेकांना मिठी मारली होती. फोटोग्राफरच्या सांगण्यावरून ही मिठी मारल्याचे तरूणीने सांगितले. या मिठीसाठी तिने नवऱ्याच्या कुटुंबियांकडून ४ लाख रुपयांची मागणी केली. तरूणीने सांगितले की, ती २५ लाख रुपये परत करण्यास तयार आहे. मात्र त्यातून ३० हजार युआन म्हणजेच भारतीय चलनात ४ लाख रुपये मिठीसाठीचा चार्ज कापणार आहे.

एवढेच नाही तर होणाऱ्या नवऱ्याबरोबर जो वेळ घालवाला, त्यासाठी लागलेला खर्चही यातच समाविष्ट केल्याचे तरूणीने सांगितले. ती म्हणाली, माझे होणाऱ्या पतीबरोबर काही वाद झालेले नाहीत. पण मला त्याच्याशी लग्न करायचे नाही.

लग्न जुळवणाऱ्या संस्थेनेही यावर आश्चर्य व्यक्त केले. असे प्रकरण आमच्या व्यवसायात अनेक दशकात घडलेले नाही, असे लग्न जुळविणाऱ्या संस्थेने सांगितले.