हे लग्नकार्याचे दिवस आहे. तुमच्या घरात नातेवाईकांमध्ये, शेजारी पाजारी अनेक लग्नकार्य असतील. आता सगळ्यांना एकच प्रश्न पडला आहे तो म्हणजे आहेरात पैशांचे पाकीट द्यायचे कसे ? एकीकडे ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर सगळ्यांची चांगली कोंडी झाली आहे. खिशात पैसे असूनही त्याला काही मोल नाही, त्यामुळे आर्थिक चणचण जाणवू लागली आहे. जिथे तिथे सुट्या पैशांचा तुटवडा आहे. बँकेत नोटा बदलायला जायचे तर तिथे भली मोठी रांग त्यामुळे करणार काय? जे काही पैसे मिळाले ते घरखर्चासाठी वापराचे की प्रवासात असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अशात लग्नकार्य आल्यावर अनेकांपुढे समस्या उभी राहिली आहे ती म्हणजे आहेरात पैसे नेमके टाकायचे कसे? आता तुमच्या या समस्येवर उपाय आला नाही असे होणार नाहीच. खास लग्नासाठी 'आयओयु' (IOU) पाकीट बाजारात आले आहेत. आता 'आयओयु' म्हणजे नक्की काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. याचा अर्थ असा आहे 'मी तुम्हाला देणे लागतो'. सध्या पैशांची चणचण प्रत्येकाला आहे त्यामुळे उपाय म्हणून हे पाकीट आले आहे. आहेरांच्या पाकीटांप्रमाणे ही पाकीटे आहेत. याच्या वरच्या बाजूला ५०१, १००१, २००१ अशी रक्कम छापण्यात आली आहे. म्हणजे अशी रिकामी पाकीटे वधू किंवा वराला द्यायची आणि जेव्हा सारे काही सुरळीत होईल तेव्हा ही रक्कम त्यांना द्यायची अशी संकल्पना आहे. 'द टाईम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार जोधपुरमध्ये अनेकांनी लग्नकार्यात ही पाकीटे वधू वराला भेट म्हणून दिली आहे.