प्रत्येक लहान मुलासाठी कार्टून हे त्याच एक छोटंसं विश्वच असतं. कार्टून पाहत असताना आजूबाजूच्या दुनियेत काय चाललं आहे, याचं भानच त्यांना राहत नाही. असंच एक विश्व ९०च्या दशकातील मुलांसाठी कार्टून नेटवर्क या वाहिनीने तयार केलं होतं. या वाहिनीवरील टॉम अ‍ॅण्ड जेरी शो, स्कुबी डुबी डू, पॉवरपफ गर्ल्स, जॉनी ब्राव्हो यासारख्या कार्यक्रमांनी ९०च्या दशकातील मुलांचं बालपण सुंदर केलं होतं. मात्र या पिढीतील मुलांसाठी एक वाईट आणि भावूक बातमी समोर आली आहे. त्यांच्या बालपणात रंग भरणारी ही वाहिनी आता ‘वॉर्नर ब्रदर्स’ या कंपनीमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा सुरु आहे. यामुळे कार्टून नेटवरच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

या पिढीतील मुलांचं कार्टून नेटवर्क या वाहिनीसह जुने आणि घट्ट नाते आहे. शाळेतून आल्यावर टॉम अ‍ॅण्ड जेरी शो, स्कुबी डुबी डू, पॉवरपफ गर्ल्स, जॉनी ब्राव्हो यासारखे आपले आवडते कार्टून कार्यक्रम पाहायचे, हा जणू दिनक्रमच झाला होता. त्यावेळी जीवन फारच सुंदर आणि सोपे होते. आता इंटरनेट ओटीटीच्या काळात आपण हे कार्यक्रम सहज पाहू शकतो. इतकंच नाही तर नव्या कार्टून कार्यक्रमांचीही सध्या भरमार आहे, मात्र त्यामध्ये पूर्वीसारखी मजा राहिलेली नाही.

काळजावर दगड ठेवून अवघ्या तीन वर्षाच्या मुकबधीर मुलाला ट्रेनमध्येच सोडून गेली आई; चिठ्ठीमध्ये लिहिलं, “माझ्यासाठी…”

वॉर्नर ब्रदर्स अ‍ॅनिमेशन आणि कार्टून नेटवर्क स्टुडिओने ते एकत्र येणार असल्याची घोषणा केली आहे. वॉर्नर ब्रदर्स टेलिव्हिजन ग्रुपमध्ये काही बदल करणार असल्याची बातमी आहे. कार्टून नेटवर्कच्या टीममधून अनेकांना काढून टाकण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे. ही बातमी समोर आल्यानंतर चाहते नाराज आणि दु:खी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वॉर्नर ब्रदर्स टेलिव्हिजन ग्रुपने मंगळवार १२ ऑक्टोबरला २६% कर्मचारी कपात करणार असल्याची घोषणा केली होती. यामध्ये स्क्रिप्टेड, अनस्क्रिप्टेड आणि अ‍ॅनिमेशनसह १२५ पदांचा समावेश आहे. ही बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांनी जुन्या कार्टून नेटवर्क वाहिनीच्या आठवणींना उजाळा देण्यास सुरुवात केली. अनेकांनी #RIPCartoonNetwork हे हॅशटॅग वापरून जुन्या कार्टून नेटवर्कला श्रद्धांजली वाहिली आहे. यानंतर हे हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करू लागले आहे.

कार्टून नेटवर्क या वाहिनीवरील कार्यक्रमांमधील अनेक पात्र अजरामर आहेत. ही पात्र आपल्या बालपणाचा एक भागच आहेत. त्यामुळेच नेटकऱ्यांना या बातमीनंतर दुःख वाटणे साहजिकच आहे.