‘आई’ या एका शब्दात आपलं सार जग सामावलंय. या जगात आपल्याला तिच घेऊन येते, बोलायला चालायलाही तिच शिकवते. इवल्याशा हातात तिचं एक बोट पकडत एक एक पाऊल टाकत चालायला शिकणं असो किंवा तिच्या तोंडून चिऊ काऊच्या गोष्टी ऐकत खाल्लेला मऊ भाताचा घास असो, या साऱ्या गोष्टी आठवल्या की पुन्हा लहान होऊन तिच्या मांडीवर शांत निजावसं वाटतं. आपण मोठे होतो, स्वत:च्या पायावर उभं राहतो स्वत:ची काळजी स्वत:च घेतो पण तिच्यासाठी मात्र सदैव आपण लहानच असतो. ती शेवटपर्यंत आपली काळजी करणं आणि आपल्यावर जीव लावणं कधीच विसरत नाही, म्हणूनच आईची ही वेगवेगळी रूप दाखवणाऱ्या काही प्रभावी व्हिडिओचं संकलन घेऊन आलोय तुमच्यासाठी.

#JustLikeMaa
असं म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी. हे खरंही आहे म्हणा. पण जगात आई नसली तरी कोणत्या ना कोणत्या रूपात आई प्रत्येकाला भेटतंच असते. मग ती मावशीच्या रूपात असो किंवा तुमची काळजी घेणाऱ्या मोठ्या ताईच्या रूपात असो. ‘निव्हिया’ची ही जाहिरात अशीच आहे. एका छोट्याशा मुलीला आई सूचना करत असते. दुसऱ्यांकडे गेल्यावर ‘नीट वाग, अजिबात दंगा करू नकोस’, ‘स्वत:ची काळजी घे’ वगैरे. मुलगीही आईच्या सूचना ऐकते आणि तिचा हात धरून खोलीतून बाहेर येते. पण हे तिचं घर नसून ते असतं अनाथाश्रम. मुलीचा हात धरत ती या छोट्या मुलीला एका जोडप्याच्या स्वाधीन करते. एका आईने आपल्या मुलीला असं दुसऱ्यांच्या स्वाधीन का केलं असा प्रश्न व्हिडिओ पाहताना सारखा मनात घुटमळत राहतो. आईचा हात सोडवत जड अंतकरणाने मुलगी आपल्या नवीन आई-बाबांकडे जाते. पण तिचा पायमध्येच अडखळतो आणि आपल्या हातात असलेली एक चिठ्ठी ती आईच्या हातात देते.. त्या चिठ्ठीत तिने असे काही लिहिले असते की ते पाहून तुमच्याही पापण्या ओलावल्या शिवाय राहणार नाही.
फक्त जन्म देते तिच आई नसते तर जी वाढवते, मोठं करते तिसुद्धा आईचं असते हे खूप प्रभावपणे या व्हिडिओतून दाखवले आहे.

#MilnaZarooriHai
‘आई मला हे दे ना’, ‘आई मला जरा ते देते का प्लीज’, ‘आई माझी ही वस्तू तू कुठे ठेवलीय?कधीपासून सापडत नाहीय’. आपण कितीही मोठं झालो तरी आपल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आपण तिच्यावर अवलंबून असतो ना!
तीही आपल्या प्रत्येक गरजांची तेवढीच काळजी घेत असते. जेव्हा ती सोबत असते तेव्हा ती आपल्यासाठी करत असलेल्या कोणात्याही गोष्टींची आपल्याला किंमत कळत नाही पण तिच्यापासून लांब जाण्याची वेळ येते तेव्हा खरच ती माय आपल्यासाठी दिवसभर किती राबायची याची प्रचिती येते, म्हणूनच Milna Zaroori Hai हा व्हिडिओ पाहायला पाहिजे. त्यातूनही अशा मुलींनी ज्या आपल्या आईपासून लांब राहतात.

प्रत्येक दिवस मातृत्त्वाचा आदर करा!
आई आपल्यासाठी किती करते ना! पण आपल्याला तिची मेहनत बघायला वेळ कुठे असतो म्हणा, आपण आपल्या जगात धुंद असतो. मग मदर्स डे आला की एक दिवस काय तो आनंद साजरा करतो. तिला भेट देतो, तिच्यासोबत सेल्फी अपलोड करतो. पुढचे दिवस ये रे माझ्या मागल्या. पण जी आपल्यावर प्रेम करू शकते ती वेळप्रसंगी कणखर होऊन तुम्हाला योग्य तो धडाही शिकवू शकते आणि नेमकं हेच दाखवून दिलंय ते फेसबुकवरच्या या व्हिडिओनो.

काय मग आईची ही विविध रूप तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हालाही हे व्हिडिओ आवडले तर शेअर करायला विसरू नका!