एका चहावाल्याला चहा विकून मिळणारे उत्पन्न किती असते हो? तुम्हाला काय वाटतं? फार फार तर वर्षाला एक दोन लाख? हाही आकाडा जरा जास्तच झालाय म्हणा. पण या चहावाल्यांचे वार्षिक उत्पन्न ऐकलंत तर तुम्ही अवाक् व्हाल. चला तर अशा चहावाल्याला भेटूयात जो चहा विकून वर्षाला किमान एक कोटींची कमाई तरी करतातच.
अभिनव टंडन आणि प्रमित शर्मा हे दोघेही इंजिनिअरिंग केलेले मित्र, पण कुठेतरी नोकरी करून दरमहिन्याला पगाराची वाट पाहण्यापेक्षा या दोघांनी आपल्या उत्पन्नाचा नवा मार्ग शोधला. या दोघांनी मिळून चहाचा ठेला सुरू केला. ऑफिसमधल्या कर्मचा-यांना मशिनच्या चहावर समाधान मानावे लागते, बिच्चारे.. मग ऑफिसच्या खाली चहाचा ठेला शोधतात. पण तिथला चहा हा चांगला असेल कशावरुन? चहाला चव असते पण स्वच्छतेचा दूरपर्यंत काही संबध नसतो आणि लोकांची हीच अडचण दूर करून अभिनव टंडन आणि प्रमित शर्मा या दोघांनी चहाचे दूकान सुरु केले.
सुरूवातीला त्यांनी आपली वेबसाईट तयार केली. आजूबाजूच्या ऑफिसमधल्या लोकांना आपल्या व्यवसायाची माहिती दिली, लोकही त्यांच्या दुकानात चहा पिण्यासाठी येऊ लागले. त्यांनी चहा कॉलिंग असे आपल्या दुकानाला नाव दिले. त्यांनी आजूबाजूच्या ऑफिसमध्येही चहाची डिलिव्हरी देण्यास सुरूवात केली. आणि बघता बघता दोघांचाही व्यवसाय इतका प्रसिद्ध झाला की फक्त चहा विकूनच आपण वर्षाकाठी एक कोटी कमावतो असे त्यांनी सांगितले. कोणताही व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो, फक्त योग्य कल्पना आणि बिझनेस माईंड असलं की तुम्ही कुठच्या कुठे पोहोचू शकता हे या दोघांनीही दाखवून दिलं.