महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्यात सत्ता कोण स्थापन करणार यावरुन चांगलाच राजकीय वाद पेटल्याचे चित्र दिसत आहे. युतीमधील भाजपा आणि शिवसेनेमधील मतभेदांमुळे सत्ता स्थापनेच्या सुत्रावर एकमत झालेले नाही. त्यामुळेच निकाल लागल्यापासून दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याबरोबर वेगवेगळे दावे करताना दिसत आहेत. याच युतीमधील शाब्दिक चकमकीचा ‘चला हवा येऊ द्या’ फेम लेखक अरविंद जगताप यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. “स्वत:च्या हिंमतीवर राजा होण्याची ताकद नसेल तर स्वराज्याची स्वप्नं तरी दाखवू नका,” असा टोला जगताप यांनी फेसबुकवरुन महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांना लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगताप यांनी आपल्या औपचारिक फेसबुक पेजवरुन राज्यात सत्ता स्थापनेसाठी सुरु असलेल्या राजकारणावर तिखट प्रतिक्रिया नोंदवली आहे. जगताप यांनी फेसबुकवर एक चार ओळींची पोस्ट लिहिली असून यामध्ये त्यांनी लोकांनी जनमत दिलेले असताना महाराष्ट्र कोण्या पटेल किंवा शाहांची वाट का पाहत आहे असा सवाल राजकारण्यांना केला आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

जगताप आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, “गुजरातचे त्याकाळचे सत्ताधारी लोक एक मराठी राजा येईल म्हणून घाबरायचे. त्या मराठी राजांचं नाव होतं शिवाजी महाराज. आता महाराष्ट्र कुणाची वाट पाहतो? कधी अहमद पटेल. कधी अमित शहा. आघाडी आणि यूतीत धमक नाही. स्वत:च्या हिंमतीवर राजा होण्याची ताकद नसेल तर स्वराज्याची स्वप्नं तरी नका दाखवू. पुन्हा कधीच महाराजांच्या नावाने मत मागू नका. स्वस्तातल्या साडीसाठी गुजरात ठीक आहे. नेता निवडीसाठी नाही.”

जगताप यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करुन या मताशी आपण सहमत असल्याचे म्हटले आहे. या पोस्टला तीन हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अनेकदा जगताप हे आपल्या लेखणीमधून न पटणाऱ्या गोष्टींवर भाष्य करतात. मागील वर्षी ३१ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर जगताप यांची पुतळ्यासंदर्भातील एक जुनी पोस्ट व्हायरल झाली होती. ‘एवढ्या धुळीत, उन्हातान्हात, पावसापाण्यात ताटकळत वर्षानुवर्ष उभं राहणं कुणाला आवडेल का? जिवंतपणी आपल्यासाठी प्रचंड हालअपेष्टा सोसलेल्या लोकांना आपण अजूनही फक्त वेदनाच देतोय असं वाटतं,’ असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं होतं. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या अनावरण सोहळ्यानंतर व्हायरल झालेली ही पोस्ट पुतळ्यांची व्यथा मांडणारी ही पोस्ट तीन आठवड्यांपूर्वीची आहे. अनेक वाचक ही पोस्ट सरदार पटेलांच्या पुतळ्यावर असल्याचा गैरसमज करून घेत आहेत. खरंतर, ही पोस्ट मी त्यावेळी एकंदर सगळ्याच पुतळ्यांची स्थिती दर्शवणारी असल्याचे मांडले होते व त्यावेळी स्टॅलिनचा पुतळा माझ्या डोळ्यासमोर होता,” असं जगताप यांनी ‘लोकसत्ता डॉट कॉम’शी बोलताना स्पष्ट केलं होतं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chala hawa yeu dya fame arvind jagtap slams politicians in maharashtra scsg
First published on: 31-10-2019 at 08:48 IST