Hashtag Inventor Quits Twitter: ट्विटर कंपनी गेल्या काही दिवसांपासून खूप जास्त चर्चेत आहे. पूर्वी सर्व यूजर्स ट्विटरवरील ब्लू टिक ही मोफत सेवा वापरत होते. पण काही दिवसांपूर्वी कंपनीचे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या ब्लू टिकसाठी यापुढे पैसे आकारले जातील अशी घोषणा केली होती. या निर्णयामुळे या सेवेसाठी पैसे न भरलेल्या यूजर्सच्या अकाउंटवरुन ब्लू टिक काढली जाईल असेही त्यांनी म्हटले होते. नुकतीच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे जगातील अनेक दिग्गजांच्या ट्विटर अकाउंटवरुन ब्लू टिक गायब झाल्याचे पाहायला मिळाले. हे प्रकरण सुरु असताना हॅशटॅगचा शोध लावणाऱ्या ख्रिस मेसिना यांनी ट्विटर कंपनी सोडली.
एलॉन मस्क यांनी लेगसी ब्लू टिकबाबत घेतलेल्या निर्णयामुळे ख्रिस मेसिना कंपनीतून बाहेर पडले असे म्हटले जात आहे. त्यांनी द व्हर्जला (The Verge) दिलेल्या मुलाखतीमध्ये कंपनी सोडण्याचे कारण सांगितले. याबाबत स्पष्टीकरण देताना ख्रिस म्हणाले, :ब्लू टिक काढण्यापेक्षा त्यावरुन तयार झालेली परिस्थिती ज्या पद्धतीने हाताळली गेली, ते पाहून मी ट्विटर सोडण्याचे ठरवले. ब्लू टिक ही माझी निवड नव्हती. मागील सहा महिन्यांमध्ये ट्विटरला जो सन्मान मिळाला, त्यापेक्षा जास्त सन्मान कंपनीला मिळायला हवा होता.”

ख्रिस मेसिना यांनी २००७ मध्ये हॅशटॅगची संकल्पना मांडली होती. हॅशटॅग्सच्या मदतीने यूजर्स विशिष्ट विषय शोधता येणार असल्याने ठराविक पोस्टचा रिच वाढण्यास मदत होणार होती. परिणामी त्या-त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना फायदा होणार होता. परिणामी ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हॅशटॅगचा वापर केला गेला. ट्विटरमध्ये हॅशटॅगसाठी विशिष्ट बॉक्स उपलब्ध आहे. याजागी तेव्हाचे ट्रेंडमध्ये असणारे हॅशटॅग्स दिसतात.
एलॉन मस्क करतात हॅशटॅग्सच्या संकल्पनेचा तिरस्कार
ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी हॅशटॅग या संकल्पनेचा तिरस्कार केला होता. ChatGPT द्वारे SpaceX वर करण्यात आलेल्या ट्विटला उत्तर देताना त्यांनी मी हॅशटॅग वापरत नसल्याचे सांगिलते होते. सध्याच्या स्थितीवरुन मस्क येत्या काही दिवसांमध्ये ट्विटरवरुन हॅशटॅग हटवणार का असा प्रश्न अनेक यूजर्सना पडला आहे.