उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते त्रिवेंद्र सिंह रावत यांनी करोना विषाणूसंदर्भात एक विचित्र वक्तव्य केलं आहे. करोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे देशामध्ये हाहाकार माजलेला असतानाच त्रिवेंद्र सिंह यांनी केलेल्या व्यक्तव्यावरुन राजकीय टीकाही सुरु झालीय. त्रिवेंद्र सिंह यांनी गुरुवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना करोना विषाणू हा सुद्धा एक जीव असून त्यालाही जगण्याचा अधिकार आहे, असं मत व्यक्त केलं आहे. सोशल नेटवर्किंगवर त्रिवेंद्र सिंह यांचं हे वक्तव्य सोशल नेटवर्किंगवर तुफान व्हायरल झालं आहे.

म्युटेड करोना विषाणूसंदर्भात बोलताना त्रिवेंद्र सिंह यांनी करोना हा सुद्धा विषाणू असून त्यालाही जगण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे. “तसं पाहिलं तर करोना विषाणू सुद्धा एक जीव आहे. बाकी जीवांप्रमाणे त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. मात्र आपण (मनुष्य) स्वत:ला बुद्धीमान समजतो. आपण त्या विषाणूला संपवण्यासाठी तयार आहोत. मात्र त्यामुळेच तो जगण्यासाठी स्वत:मध्ये सतत बदल घडवतोय,” असं त्रिवेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. यावरुन काँग्रेससहीत विरोधी पक्षांनी त्रिवेंद्र सिंह यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या डिजिटल टीममधील सदस्य आणि नेते असणाऱ्या गौरव पांधी यांनी अशा लोकांमुळेच आपल्या देशाला आज करोना संकटाचा समाना करावा लागत असल्याचा टोला लगावला आहे. पांधी यांनी त्रिवेंद्र सिंह यांचा व्हिडीओही शेअर केलाय.

करोना विषाणूपासून वाचण्यासाठी काय करावं लागेल यासंदर्भातही त्रिवेंद्र सिंह यांनी भाष्य केलं आहे. आपल्याला सुरक्षित राहण्यासाठी या विषाणूच्या पुढे जावं लागणार आहे, असं त्रिवेंद्र सिंह मानले आहेत. या व्हिडीओवर कमेंट करताना एकाने, “या जीवाला सेंट्रल व्हिस्टामध्ये आश्रय देण्यात यावा” असा टोला लगावला आहे. तर राष्ट्रीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवाय यांनी, “करोना एक प्राणी आहे असं माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते त्रिवेंद्र सिंह म्हणत आहेत. या विचारसरणीनुसार त्याला आधारकार्ड किंवा रेशन कार्डही द्यायला हवं,” असा उपरोधिक टोला लगावला आहे.