जगभरातील १८० हून अधिक देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यातच युरोपीयन देशांना करोनाचा मोठा फटका बसला आहे. येथील इटली, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीसारख्या देशांमध्ये करोनाने थैमान घातलं आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली असून मागील अनेक आठवड्यांपासून हे लॉकडाउन सुरु आहे. सध्याची परिस्थिती पाहता अनेक देशांनी लॉकडाउनचा कालावधी मे महिन्याच्या मध्यापर्यंत वाढवला आहे तर काही देश तो वाढवण्याचा विचार करत आहे. लॉकडाउनमुळे हजारो लोकं आपल्या घरांमध्ये बंदिस्त झाले आहेत. भारतामध्येही लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. अनेकांनी लॉकडाउनदरम्यान वेळ घालवण्यासाठी इंटरनेट आणि ऑनलाइन गेम्सचा आधार घेतल्याचे चित्र दिसत आहे. असं असतानाच इटलीमधील दोन मुलींनी मात्र अनोख्या पद्धतीने टेनिस मॅच खेळत आपला वेळ घालवला. दोन वेगवेगळ्या इमारतीच्या गच्चीवरुन या मुली टेनिस खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

इटलीमधील लिगुरीयन येथील फिनाले लिगुरे या शहरामधील हा व्हिडिओ असल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे. या व्हिडिओमध्ये दोन वेगवेगळ्या इमारतींच्या गच्चीवरुन दोन मुली टेनिस खेळताना दिसत आहे. या मुलींनी व्हिडिओमध्ये फोर हॅण्ड, बॅक हॅण्ड असे फटके मारत चक्क एका गच्चीवरुन दुसऱ्या गच्चीवर १२ शॉर्टची मॅच खेळण्याचे दिसत आहे. अर्थात हा व्हिडिओ केवळ २४ सेकंदाचा असला तरी तो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या दोन्ही मुली ज्या स्थानिक टेनिस क्लबलच्या सदस्य आहेत त्या क्लबने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

टेनिस खेळणाऱ्या मुलींचा नावे व्हिक्टोरीया आणि कॅरोला अशी आहेत. हा व्हिडिओ व्हिक्टोरीयाचे वडील मॅक्स ऑलिव्हरी यांनी शूट केला आहे. या मुलींच्या प्रशिक्षकांनी घरी सुरु असणाऱ्या सरावाचा व्हिडिओ शूट करण्यास सांगितल्याने आपण हा व्हिडिओ शूट केल्याचे मॅक्स यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सामन्यादरम्यान सुरुवातीला काही चेंडू दोन इमारतींच्या दरम्यान असणाऱ्या रस्त्यावर पडले. मात्र रस्त्यावर कोणीही नसल्याने त्याचा विशेष फरक पडला नाही. हे बॉल कलेक्ट करण्यासाठी खाली एक पिशवीही ठेवण्यात आली होती.