सध्या देशभरामध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. नागरिकांनी घरात रहावे यासंदर्भातील आवाहन पोलिसांबरोबरच प्रशासनामार्फत केलं जातं आहे. मात्र यासर्वांमध्ये आपल्या भन्नाट ट्विटमुळे चर्चेत असणारे मुंबई पोलीस पुन्हा आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. आपल्या उत्तम रिप्लाय सेन्समुळे आणि तरुणांच्या आवडत्या मिम्सच्या भाषेमध्ये त्यांच्यापर्यंत समोपदेशनाचे आणि घरात राहण्याच्या तसेच करोनासंदर्भातील आवाहन करण्यात मुंबई पोलिसांचा हातखंड आहे. काळानुसार बदल करत तरुणांच्या भाषेतच त्यांच्याच भाषेत समजवण्यासाठी मुंबई पोलीस अनेकदा ट्रेण्डींग असणाऱ्या गोष्टींचा आधार घेत असतात. सध्या तरुणाईमध्ये चर्चेत असणारी गोष्ट म्हणजे ‘नेटफ्लिक्स’वर ‘मनी हाइस्ट’चा चौथा सिझन. यावरुनच मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच घरात थांबण्याचा हटके सल्ला दिला होता. आता हाच कित्ता महाराष्ट्र पोलिसांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन गिरवला असून तो ही अस्सल मराठमोळ्या स्पॅनिश भाषेत.

काय म्हणता काही कळलं नाही का. आहो ‘नेटफ्लिक्स’वर ‘मनी हाइस्ट’ ही मूळची स्पॅनिश सिरिज आहे. या सिरिजचे मूळ स्पॅनिश नाव हे ‘ला कासा डी पापेल’ La casa de papel असं आहे. या शब्दांचा अर्थ होतो कागदाचे घर. ही सिरिज पाहणाऱ्यांना ही सर्व सिरिज स्पेनमधील नोटांची छपाई करणारी बँक लुटण्यासंदर्भातील आहे हे ठाऊक आहे. यावरुनच हे नाव ठेवण्यात आलं आहे. मात्र या  ‘ला कासा डी पापेल’वरुन आता आगळ्यावेगळ्या मराठी भाषेतील वाक्य शेअर करण्याचा ट्रेण्ड सोशल नेटवर्किंगवर दिसत आहे. उदाहणार्थ सांगायचं झाल्यास मासेविक्री करणाऱ्या महिलेच्या फोटोवर ‘ला कसा दिला पापटेल’ असे शब्द लिहिण्यात आले होते. हे मीम प्रचंड व्हायरल झाले होते.

आता महाराष्ट्र पोलिसांनाही अशाच प्रकारे मराठमोळ्या स्पॅनिश भाषेत राज्यातील जनतेला घराबाहेर जाऊ नका असं सांगितलं आहे. ‘मनी हाइस्ट’मधील मुखवट्यांच्या फोटोवर ‘कासा ला पडता बाहेर’ असं लिहिण्यात आलं आहे. कसा या शब्दाचा स्पॅनिश भाषेत अर्थ घर असा होतो. या फोटोला पोलिसांनी, ‘कारण आता सुरक्षिततेचा खजिना तर घराच्या आत आहे, बाहेर नाही’ अशी भन्नाट कॅप्शन देत मनी हाइस्टशी अप्रत्यक्षरित्या संबंध जोडला आहे. तसेच या ट्विटबरोबर पोलिसांनी घरीच राहा, घरीच थांबा सुरक्षित राहा, करोवाविरुद्धचे युद्ध असे हॅशटॅग दिले आहेत.

काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांनी लॉकडाउनमध्ये घरी राहण्याला किती महत्त्व आहे, हे सांगण्यासाठी मनी हाइस्टमधील प्रोफेसरचा फोटो वापरुन एक मजेशीर ट्विट केलं होतं. ‘लॉकडाउनमध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत विनाकारण घराबाहेर जाण्याचा प्लॅन करता..’ याच्याच पुढे प्रोफेसरचा गाजलेला संवाद मीममध्ये जोडण्यात आला आहे, अशावेळी ‘आपण आपली अक्कल गहाण ठेवली आहे का?’, असा सवाल प्रश्न घराबाहेर पडणाऱ्यांना विचारण्यात आला होता.