कॅनडाच्या पूर्वेला असणाऱ्या क्विबेक प्रांतामध्ये मागील एका महिन्याहून अधिक काळापासून लॉकडाउन सुरु आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने लॉकडाउनची घोषणा करुन काही आठवडे उलटले आहेत. लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यानंतर जंगलांचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रदेशामधील रस्त्यांवरील वाहतुक अगदीच कमी झाली आहे. रस्त्यावरील वाहनांची संख्या इतकी कमी झाली आहे की येथील एका हायवेवर चक्क एक लहान विमान उतरल्याची घटना समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्विबेक शहरामधील हायवेवर एका लहान आकाराच्या विमानाची आपत्कालीन लॅण्डींग करण्यात आली. विशेष म्हणजे यावेळेस हायवेवरील गाड्यांची वाहतुक थांबवण्यात आलेली नव्हती. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, वैमानिक पायपर चिरोकी याने विमान हायवेवर उतरवण्यासाठी शहरातील आग्निशामन दलाशी संपर्क करुन यासंदर्भात परवानगी मागितली होती. शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळापासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हायवेवरच हे विमान उतरवण्यात आलं.

या विमानाच्या लॅण्डींगचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये विमान हायवेवर उतरल्यानंतर काही अंतर पुढे गेल्याचे दिसत आहे. विमानाबरोबरच हायवेवर गाड्याही धावताना दिसत आहेत. ही सर्व घटना गुरुवारी १६ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ एका चालकाने आपल्या गाडीमधून काढेलेला आहे. या व्हिडिओमध्ये गाड्या रस्त्यावर धावत असतानाच विमान लॅण्डींग करताना दिसत आहे.

या विमानाला आपत्कालीन लॅण्डींग का करावं लागलं याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांना ठोसपणे काहीच सांगता आलेलं नाही. “हायवे क्रमांक ४० वर एका विमानाने लॅण्डींग केल्याचा फोन आम्हाला आला. नशिबाने कोणताही अपघात न होता हे विमान सुखरुपपणे जमीनवर उतरले. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. विमान उतरल्यानंतर थोड्या वेळातच हायवेवरील वाहतुक सुरळीतपणे सुरु झाली,” अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. अचानक विमान हायवेवर उतरल्याने काही काळ रस्त्यावरील वाहतुक थांबवण्यात आली होती. मात्र एका तासाच्या आत ही वाहतुक पुन्हा सुरळीत करण्यात आल्याचे, ‘न्यूयॉर्क डेली न्यूज’ने आपल्या वृत्तामध्ये म्हटले आहे. चौकशीनंतर विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हायवेवर विमान उतरवावे लागल्याची माहिती समोर आली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus watch small plane makes emergency landing between cars on a highway in canada scsg
First published on: 18-04-2020 at 10:13 IST