करोनामुळे संपूर्ण जगाला फटका बसल्याचं वास्तव डोळ्यासमोर असताना यातून काही जणांनी काहीच धडा घेतला नसल्याचं दिसत आहे. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं आहे. सरकार यासाठी उपाययोजना करत आहे. दुसरीकडे सरकार स्वच्छ भारत अभियान राबवत आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहीम सुरु केली होती. अनेकांनी स्वच्छ भारत अभियानाचं कौतुक देखील केलं. मात्र सोशल मीडियावर डोळ्यात अंजन घालणारा एक फोटो व्हायरल होत आहे. रेल्वे ट्रकच्या बाजूला लाल रंगाचा एक पट्टा तयार झाल्याचा फोटो व्हायरल होत आहे. कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल की, हा लाल रंग रेल्वेने वगैरे लावला आहे की काय? पण तसं काहीही नसून धक्कादायक बाब म्हणजे पान, गुटखा थुंकून आलेला रंग आहे. ही नुसती रेल्वे ट्रॅकची अवस्था नाही तर रेल्वेच्या खिडक्या, डब्बे, स्थानकातला पिलर आणि भिंती या रंगांनी रंगलेल्या दिसतील. आश्चर्याची बाब म्हणजे पादचारी पुलावरून थेट पत्र्यावर थुंकण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. त्यामुळे निळे पत्रे आता लाल दिसू लागले आहेत. तर कचऱ्याकुंड्यांमध्ये लाल थर जमल्याचं विदारक दृष्य दिसेल.

सोशल मीडियावर हा फोटो वेगाने व्हायरल होत असून रेल्वेची दूरवस्था यातून दिसत आहे. व्हायरल फोटोवर अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. थुंकल्याचा दंड वसूल करण्यात रेल्वे अपयशी ठरत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. एका युजर्सने ‘स्वच्छतेच्या बाबतीत भारतीयांना कधी समजेल देव जाणे’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसऱ्या युजर्सने ‘हा लाल पट्टा म्हणजे जगातील आठवं आश्चर्य’ असल्याचं सांगितलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेकदा इच्छा नसताना सफाई कर्मचाऱ्यांना गुटखा आणि पान थुंकल्याची जागा स्वच्छ करावी लागते. पण थुंकणाऱ्यांची रोजचीच सवय झाल्याने कर्मचारीही हतबल झाले आहेत. थुंकण्यातून अनेक आजार पसरतात.