लच्छीवाला वनपरिक्षेत्राअंतर्गत देहराडूनजवळील मणीमाई मंदिराजवळ सामुदायिक जेवणादरम्यान शनिवारी रात्री एका शक्तीशाली बिथरलेल्या हत्तीने गाड्या पलटी करत गोंधळ घातला. हत्ती रस्त्यावर धावू लागल्याने लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. हे दृश्य एका थरारक व्हिडिओमध्ये कैद झालं असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
शनिवारी रात्री जंगली हत्तींचा एक कळप चुकून त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आला तेव्हा ही घटना घडली, ज्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली, असे जागरण हिंदीने वृत्त दिले आहे.
काय घडलं नेमकं?
शनिवारी रात्री लच्छीवाला वनक्षेत्राच्या हद्दीत मणी माई मंदिराजवळ एक सामुदायिक जेवण आयोजित करण्यात आले होते.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, ही घटना रात्री ८.३० च्या सुमारास घडली, जेव्हा एक नर, मादी हत्ती आणि एक पिल्लू जंगलातून बाहेर पडले आणि कार्यक्रमस्थळाजवळील रस्त्यावर थेट जेवणाच्या ठिकाणी पोहोचले. अहवालात म्हटले आहे की, कळपातील एका हत्तीने जोरात सोंडेने गर्जना केली आणि रस्त्यावर दोन पार्क केलेल्या ट्रॉली उलटल्या आणि धावत सुटला.
वन विभागाची तत्काळ कारवाई
प्रतिसाद पथकाचे नेतृत्व करणारे वन निरीक्षक पुरण सिंग रावत त्यांच्या कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी पोहोचले. सामुदायिक जेवणाचा तंबू तातडीने रिकामा करण्यात आला आणि अधिकाऱ्यांनी हत्तींना जंगलात परत हाकलण्यासाठी ध्वनी बॉम्ब आणि फटाक्यांचा वापर केला. सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी या भागात रात्रभर गस्त घालण्यात आली, असे अहवालात म्हटले आहे.
व्हिडिओमध्ये काय दिसतंय?
व्हिडिओमध्ये हत्ती रस्त्यावर भरधाव वेगाने धावताना दिसतो आणि एक ट्रॅक्टर पलटी करत असल्याचा थरारक क्षण कैद झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी हजर राहून वाहतूक आणि गर्दी नियंत्रण केलं. देहराडून-हरिद्वार हायवेवर काही काळासाठी वाहतूक खोळंबली होती, पण ती लगेचच सुरळीत करण्यात आली.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
या घटनेत कोणतीही मोठी दुखापत किंवा जीवितहानी झाली नसल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र ही घटना अत्यंत धोकादायक ठरू शकली असती, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
पूर्वीही घडल्या आहेत अशा घटना
- २०२२ मध्ये ओडिशाच्या कटकमध्ये एक हत्तीने दोन वृद्धांना चिरडून ठार केलं होतं.
- २०२३ मध्ये केरळच्या पलक्कड जिल्ह्यात एक हत्ती उधळल्याने अनेक वाहनांचे नुकसान झालं होतं. वृत्तानुसार, बांधलेला हत्ती सुटण्यात यशस्वी झाला आणि त्याने रस्त्यावर गोंधळ निर्माण केला.
हत्तींचे मानवी वस्तीत येणे का वाढले आहे?
वनक्षेत्रांजवळ वाढणारी मानवी हालचाल, जंगलांचा ऱ्हास, आणि अन्न-पाण्याचा अभाव यामुळे हत्तींचं मानववस्तीतील आक्रमण वाढले आहे. त्यामुळे वन्यजीव व मानव यांच्यातील संघर्ष गंभीर होत चालला आहे.