रॉबिन हूडच्या कथा तुम्ही ऐकल्यात? श्रीमंत लोकांच्या घरात चोरी करुन तो गरिबांना मदत करत असे. कदाचित त्याचाच आदर्श घेऊन अशाप्रकारचे कृत्य एका तरुणाने केल्याचे समोर आले आहे. दिल्लीमधील २७ वर्षांच्या इरफानने अशाप्रकारचे कृत्य केले असून तो रिअल लाईफमधील रॉबिन हूड म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. दिल्लीतील श्रीमंत घरांमध्ये चोरी करुन त्याने काही मुद्देमाल जमवला आणि बिहार या आपल्या राज्यात येत त्याने अर्थिक दुर्बल घटकांतील लोकांना मदत केली आहे. विशेष म्हणजे अशी मदत करताना आपण समाजसेवक असल्याचे त्याने भासवले.
याशिवाय त्याने ८ कुटुंबांना त्यांच्या घरातील लग्नाचा खर्च करण्यासाठीही काही रक्कम देऊ केली आहे. असे असले तरीही गंमत म्हणजे इरफानने चोरी केलेल्या रकमेतील काही रक्कम स्वतःसाठीही राखून ठेवली आहे. त्याने ५वीमध्येच शिक्षण सोडून दिले असून दिल्लीतील १२ घरांमध्ये चोरी केल्याच्या आरोपावरुन त्याला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महागड्या कार आणि घड्याळे वापरण्याची त्याला विशेष आवड आहे.
वाचा : सैन्याची सदभावना, सीमारेषेवर दिलं जातंय काश्मिरी मुलांना मोफत शिक्षण
पोलिसांनी त्याला त्याच्या बिहारमधील घरातून ताब्यात घेतले तेव्हा त्याने रोलेक्सचे घड्याळ घातलेले होते. इतकेच नाही तर चोरी केलेली महागडी घड्याळे आणि दागिने विकून त्याने नुकतीच होंडा सिव्हीक गाडीही खरेदी केली आहे. पोलिस त्याचा शोध घेत बिहारमधील पुपरी या गावात गेले तेव्हा तो समाजसेवक आहे आणि त्याचे नाव उजाला बाबू आहे असे स्थानिकांनी पोलिसांना सांगितले. इरफानने त्याची ओळख केवळ त्याच्या गावातील लोकांपासूनच लपवली नसून त्याच्या गर्लफ्रेंडलाही तो नेमका कोण आहे याची माहिती नाही. तिने अनेक भोजपुरी चित्रपटात काम केले आहे. चार वर्षांपूर्वी इरफान नोकरीच्या शोधात दिल्लीमध्ये आला होता. त्यावेळी त्याने कपड्याचा व्यवसायही सुरु केला मात्र तो त्यात अपयशी झाला.