दीपावलीच्या निमित्ताने आपल्या आसपास पसरलेल्या तेजाला सुगंधी साथ हवी हवीशी वाटते. ती ओढ आपल्यालाच नाही तर आपल्या पूर्वजांनाही असावी आणि म्हणूनच दीपावलीच्या पहिल्या दिवशी अभ्यंगस्नानाचं प्रयोजन त्यांनी केलं. या स्नानात उटण्याचं महत्त्व ही पारंपरिकता आहे. पण ज्या ब्रॅण्डने स्वत:चं अस्तित्व निर्माण करत या परंपरेला आपल्या नवतेची जोड दिली तो ब्रॅण्ड म्हणजे मोती साबण. आजच्या पहिल्या अंघोळीला आवर्जून अनेक कुटुंबात मोती साबणानेच अंघोळी केली जाते. बाकीच्या परंपरेप्रमाणेच मोती साबणाने अंघोळी केली जाते. दिवाळीतील या अविभाज्य ब्रॅण्ड कथादेखील तिमिरातूनी तेजाकडे अशीच आहे.

कोणी बनवला मोती साबण?

सत्तरच्या दशकात टॉमको अर्थात टाटा ऑइल मिल्सने या प्रसिद्ध मोती साबणाची निर्मिती केली. हा साबण अनेक अर्थाने वेगळा होता. कारण चौकोनी वडय़ांच्या आकारात येणाऱ्या साबणांच्या काळात मोती साबण आकाराने मोठा आणि गोल होता. मोती या नावाला साजेसा आकार त्याला जाणीवपूर्वक देण्यात आला होता. गुलाब, चंदन सुगंधात उपलब्ध असलेल्या या साबणाने सुरुवातीपासून शाही थाट दाखवला. त्याची त्या काळी किंमत २५ रु एवढी होती. या साबणाने सतत स्वत:ला दिव्यानुभवाशी आणि मोती या संकल्पनेशी जोडून ठेवलं.

(हे ही वाचा: Diwali 2021: नरक चतुर्दशी का साजरी केली जाते? जाणून घ्या पौराणिक कथा )

कशी होती छापील जाहिरात?

ऐंशीच्या दशकातील मोतीच्या छापील जाहिरातीत समुद्रकिनारी भल्यामोठय़ा शिंपल्यात विराजमान मोती साबण दाखवला गेला होता. एकूण हा साबण बऱ्यापैकी लोकप्रिय होता. मात्र १९९३ साली टॉमको कंपनी हिंदुस्थान लिव्हर कंपनीत समाविष्ट झाली आणि हिंदुस्थान लिव्हरने हा साबण विशिष्ट प्रसंगी वापरायलाच हवा, अशा मंगल, उत्सवी, पवित्र संकल्पनेशी जोडला. दिवाळी आणि मोती हे नातं नव्वदीत दृढ झालं.

प्रसिद्ध जाहिरात

२०१३ मध्ये साबणाची आजही प्रसिद्ध असलेली जाहिरात आली. टिपिकल चाळीचं वातावरण, वयस्कर- तरुण – बाल अशा तिन्ही पिढय़ांचा खुबीने जाहिरातीत केलेला वापर आणि मुख्य म्हणजे ‘‘उठा उठा दिवाळी आली’’ ही पंचलाइन.. या सगळ्या गोष्टी ग्राहकांना भूतकाळात नेण्यासाठी योजल्या होत्या. ग्राहकांना भूतकाळातून वर्तमानात आणलं होतं आणि मोती साबण ही आपली जणू एक परंपरा आहे असं वातावरण तयार केलं गेलं. याच काळात सोशल मीडिया प्रभावी झाला होता. एखादं उत्पादन जाहिरातीमुळे पुन्हा कसं चर्चेत येऊ शकतं याचं मोती साबण हे उत्तम उदाहरण आहे.

( हे ही वाचा: Vastu Tips: दिवाळीच्या दिवशी घरात आवर्जून करा ‘या’ पाच गोष्टी )

आज दिवाळी आणि मोतीसाबण हे समीकरण अभेद्य आहे. उटणं, सुवासिक द्रव्य अभ्यंगस्नानात आपापल्या परीने काम करत असूनही मोती साबणाशिवाय हे स्नान अपूर्ण वाटावे इतपत या ब्रॅण्डने दिवाळीशी घरोबा केला आहे. दिवाळी म्हणजे दिवे, दिवाळी म्हणजे फराळ, दिवाळी म्हणजे कंदील तसंच दिवाळी म्हणजे मोती साबण हे अद्वैत आहे.

(मूळ लेख: ब्रॅण्डनामा : मोती साबण )

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.