टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांनी (Elon Musk) ट्विटरमध्ये २.८ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केल्यानंतर लगेच ट्विटरमध्ये बदल करण्याच्या दृष्टीने पावलं उचलण्यास सुरुवात केल्याचे संकेत दिलेत. २.८ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीसहीत मस्क हे ट्विटर कंपनीतील ९.२ टक्के हिश्शासहीत सर्वात मोठे समभागधारक झाले आहेत. विशेष म्हणजे एलन मस्क यांच्याकडे ट्विटरचा सहसंस्थापक असणाऱ्या जॅक डॉर्सींपेक्षा चारपट समभाग आहेत. मस्क यांच्या या निर्णयानंतर ट्विटरच्या समभागांमध्ये २६ टक्क्यांनी तेजी पाहायला मिळत असताना त्यांनी केलेल्या एका ट्विटची सध्या ट्विटरवर तुफान चर्चा आहे.
भारतीय वेळेनुसार मंगळवारी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास मस्क यांनी, “तुम्हाला एडीट बटण हवंय का?” असा प्रश्न विचारत एक जनमत चाचणी म्हणजेच ट्विटर पोल घेतलाय. होय किंवा नाही असे दोन पर्याय मस्क यांनी दिलेत. या ट्विटर पोलला पहिल्या चार तासांमध्ये (सकाळी १० वाजेपर्यंत) १५ लाख ९५ हजारहून अधिक मतं नोंदवण्यात आली. तर साडेदहा वाजता हा आकडा १६ लाख ७० हजारांहून अधिक होता. हे ट्विट ३२ हजार ६०० हून अधिक वेळा रिट्विट करण्यात आलं असून त्याला एक लाख १० हजारांहून अधिक लाइक्स आहेत.
सकाळी दहा पर्यंतच्या आकडेवारीनुसार ७५ टक्के लोकांनी होय एडीट पर्याय हवाय असं म्हटलंय तर २५ टक्के लोकांनी ट्विटर आहे तसच बरं आहे अशा अर्थाचं मत व्यक्त केलंय.

विशेष म्हणजे एलन मस्क यांनी ट्विटरमध्ये एवढी मोठी गुंतवणूक करण्याआधीही एक पोल घेतला होता. त्यात त्यांनी आपल्या ८ कोटी फॉलोवर्सला ट्विटर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं कठोरपणे पालन करते की नाही? असा प्रश्न विचारला होता. तसेच सर्वांना काळजीने मतदान करावं कारण या मतदानाचे परिणाम महत्त्वाचे असणार आहे असंही म्हटलं होतं. या मतदानामध्ये ७० टक्के लोकांनी ‘नाही’ असं उत्तर दिलं. यानंतर एलन मस्क यांनी ट्विटरला इतर कोणता पर्याय आहे का असं विचारलं होतं. तसेच मी माझा स्वतःच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मबाबत गंभीर विचार करत आहे, असंही त्यांनी नमूद केलं होतं. त्यानंतर लगेचच त्यांनी ट्विटरमध्ये मोठी गुंतवणूक केल्याची बातमी समोर आलेली.
ट्विटरमधील गुंतवणुकीआधीचा पोल आणि नंतरची घडामोड आणि आता पुन्हा एकदा ट्विटरवर एडीट बटणसंदर्भातील पोल यावरुन लवकरच ट्विटरमध्ये काहीतरी मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मात्र दुसरीकडे मस्क हे केवळ चाचपणीसाठी पोल घेत असल्याचं काहींचं म्हणणं आहे. यावर ३१ हजार कमेंट्स आल्यात.