कुत्रा हा अतिशय प्रामाणिक प्राणी असून तो आपल्या मालकाला वाचवण्यासाठी काहीही करायला तयार असतो, असं म्हटलं जातं. याच वाक्याला साजेशा घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही कुत्रे लहान मुलाला वाचवण्यासाठी सापाशी लढताना दिसत आहेत. आउट ऑफ कॉन्टेक्स्ट ह्युमन रेस नावाच्या ट्विटर पेजवरून हा शेअर करण्यात आला आहे. हा ७ सेकंदांचा व्हिडिओ आतापर्यंत ४ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर हजारो लोकांनी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
व्हिडीओमध्ये एक मूल प्रॅममध्ये झोपलेले दिसत आहे. इतक्यात त्याच्या मागून एक विषारी साप येतो. साप त्या मुलाला काही इजा करेल म्हणून घरातील २-३ कुत्रे त्या सापाला तेथून हाकलवण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. लहान मुलाच्या प्रॅमजवळ तीन कुत्रे सापाशी भांडताना दिसत आहेत. दरम्यान, या कुत्र्यांपैकी एक सापाला तोंडात पकडतो आणि दूर फेकतो. दरम्यान, कुत्र्याने फेकलेला साप व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर गेल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. शिवाय साप अंगावर पडताच व्हिडीओ शूट करणारा व्यक्ती मोठ्यांने ओरडल्याचा आवाजही येत आहे.
हेही पाहा- किळसवाणा प्रकार! डॉमिनोज पिझ्झामध्ये सापडल्या जिवंत अळ्या? फोटो शेअर करत ग्राहकाने केले गंभीर आरोप
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकजण हा व्हिडीओ शेअर करताना व्हिडीओतील कुत्र्यांचं खूप कौतुक करत आहेत. तर अनेकांनी कुत्र्यांबद्दलच्या भावना कमेंट बॉक्समध्ये व्यक्त केल्या आहेत. एका नेटकऱ्याने खरंच कुत्र्यांसारखा प्रामाणिक प्राणी आजपर्यंत पाहिला नसल्याचं म्हटलं आहे. तर आणखी व्यक्तीने, कुत्र्यांनी आपला जीव धोक्यात घालून मुलाला वाचवल्याचं म्हटलं आहे. मात्र, काही नेटकऱ्यांनी मुलाला एकटे सोडणाऱ्या पालकांवर प्रश्न उपस्थित केले आहे. शिवाय शूट करणाऱ्या व्यक्तीवरही काही लोकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. व्हिडीओ करण्याच्या नादात लहान मुलाचा जीव धोक्यात घातल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.