करोना संकटकाळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी मास्क न घातल्यामुळे तर कधी मास्कला आवश्यक नसल्याचं सांगितल्यामुळे चर्चेत राहिलेत. आता व्हाइट हाउसमध्ये नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला मास्क काढ, असं सांगतानाचा ट्रम्प यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ट्रम्प यांनी मास्क हटवण्यास सांगितल्यावर पत्रकाराने मात्र त्यासाठी नकार दिला.

व्हाइट हाउसमध्ये सोमवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेतला हा व्हिडिओ असल्याचं समजतंय. Reuters या वृत्तसंस्थेचे पत्रकार जेफ मेसन यांनी ट्रम्प यांना एक प्रश्न विचारला, पण मास्क घातल्यामुळे ट्रम्प यांना त्यांचा आवाज कमी ऐकू येत होता. त्यामुळे ट्रम्प यांनी मेसन यांना मास्क काढून प्रश्न विचारण्यास सांगितलं. त्यावर मेसन यांनी मास्क हटवण्यास नकार दिला, पण आपण मोठ्या आवाजात बोलू असं म्हटलं आणि पुन्हा प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. त्यावर ट्रम्प यांनी, ‘तुम्ही किती दूर आहात…तुम्हाला मास्क हटवावा लागेल…तुम्ही काढू शकतात…जर तुम्ही मास्क हटवला नाही तर तुमचा आवाज कमी ऐकायला येईल. त्यामुळे जर तुम्ही मास्क काढला तर बरं होईल’ असं मेसन यांना सांगतात. पण मेसन परत ‘मी जोरात बोलेन, आता नीट ऐकायला येतंय’ का अशी विचारणा करतात. अखेर ट्रम्प ‘हो आता ठिक आहे’ असं बोलताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर याच पत्रकार परिषदेत मास्क न घालता प्रश्न विचारणाऱ्या दुसऱ्या एका पत्रकाराचं ट्रम्प कौतुकही करतात.


या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकजण ट्रम्प यांच्यावर टीका करत आहेत. तर, मास्क न हटवण्यावर ठाम राहिलेल्या पत्रकाराचं नेटकरी कौतुकही करत आहेत.