अमेरिकेमध्ये करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. असं असतानाच तेथील सर्वसामान्य जनतेने मात्र करोना संसर्गाला गांभीर्याने घेताना दिसत नाहीय. यावरुनच आरोग्य तज्ज्ञ डॉ. कोरी हॅबर्ट यांनी सर्वसामान्यांबरोबरच महामारीच्या काळात राजकीय प्रचार करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. “या विकेण्डला तुम्ही अमेरिकेबद्दल देशभक्ती व्यक्त करण्यासाठी एकच गोष्ट करा घरी थांबा,” अशा शब्दांमध्ये कोरी यांनी सुनावलं आहे. सध्याच्या कालावधीमध्ये राजकारण आणि विज्ञानामधील सीमा खूपच धुसर झाली असल्याचेही हॅबर्ट यांनी म्हटलं आहे.
ल्युसियाना राज्यातील न्यू ऑरलेन्समध्ये राहणाऱ्या हॅबर्ट यांनी एका वृत्तवाहिनीमधील चर्चासत्रामध्ये बोलताना सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य आपण लक्षात घ्यायला हवं असं मत व्यक्त केलं. ब्लॅक न्यूज चॅनेलच्या आरोग्य विभागाचे मुख्य संपादक असणाऱ्या हॅबर्ट यांनी करोना संसर्गाला गांभीर्याने न घेणाऱ्यांना कठोर शब्दामध्ये इशारा दिला आहे. आपला देश करोना संसर्गाच्या दुसऱ्या टप्प्याकडे जात असतानाच आपल्यापैकी अनेकजण राजकीय प्रचारासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. अनेकजण मास्क न लावताच सार्वजनिक ठिकाणी फिरत आहेत. फूल पार्ट्यांचे आयोजन केलं जात आहे. लोकांमध्ये करोना संसर्गाचे गांभीर्य नाहीय हे परिस्थिती चिंताजनक असून यामुळे करोनाचा संसर्ग अधिक झपाट्याने होईल असं मत हॅबर्ट यांनी व्यक्त केलं आहे. ते एमएसएनबीसी या वृत्तवाहिनीवरील चर्चा सत्रामध्ये सहभागी झाले होते त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं.
अमेरिकेमध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेल्या निर्बंधांना जोरदार विरोध होताना दिसत आहे. मागील काही आठवड्यांपासून अर्थव्यवस्था पुन्हा सुरु करा, सर्व निर्बंध उठवा अशा मागण्यासाठी अनेकजण रस्त्यावर उतरुन आंदोलने करताना दिसत आहेत. काही राज्यांमध्ये तर शस्त्र आंदोलने झाल्याचे पहायला मिळालं आहे. काही ठिकाणी तर कोवीड पार्ट्यांचे आयोजन केलं जात असल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत.
“The most patriotic thing you can do in America this weekend is stay home,” says Dr. Corey Hébert. “The line between science and politics is being dangerously blurred right now.”
“Don’t choose barbecue and beer over your life and your family’s life.”https://t.co/QbMdheApHD
— MSNBC (@MSNBC) July 6, 2020
याच सर्व परिस्थितीवरुन हॅबर्ट यांनी नाराजी व्यक्त करताना करोनाच्या संसर्गापेक्षा लोकांच्या वागणुकीबद्दल अधिक आश्चर्य वाटत असल्याचे म्हटले आहे. “मी इथे घरात बसून देश दुसऱ्या टप्प्यात जात असल्याचा विचार करतोय आणि काहीजण विकेण्डला बार्बेक्यू व बीअरचा प्लॅन बनवत आहेत. मला अशा लोकांना एकच सांगावेसे वाटत आहे. जर तुम्हाला देशाबद्दल प्रेम व्यक्त करायचं आहे सुरक्षित रहायचं आहे बार्बेक्यू व बीअर महत्त्वाची का जीव? हे तुम्हीलाच ठरवावे लागेल. माझा सल्ला ऐकणार असाल तर विकेण्डला घरातच थांबा,”असंही हॅबर्ट यांनी म्हटलं आहे.
