Eagle Attack Bird Video : देव तारी त्याला कोण मारी ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. म्हणजे एखाद्याचं नशीब इतकं बलवत्तर असतं की, कितीही मोठं संकट आलं तरी तो त्यातून सुखरूप बाहेर पडू शकतो. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियाव व्हायरल होत आहे, ज्यात एका शिकारी गरुडाने एका निष्पाप पक्ष्याला आपल्या पंजात पकडले, यावेळी पक्ष्याचा जगण्या-मरण्यासाठी संघर्ष सुरू होता, ती जोरजोरात किंचाळत होती, हे पाहून वाटलं की, कोणत्याही क्षणी पक्ष्याचा जीव घेतला जाईल पण पुढे पक्षी जी हिंमत दाखवत आपला जीव वाचवतो ते पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका घराच्या छतावर गरुडाने आपल्या पंजात पक्ष्याला घट्ट पकडून ठेवलेय, कोणत्याही क्षणी गरुड त्या पक्ष्याचा जीव घेईल, असे वाटत होते; पण तो पक्षी पूर्ण ताकदीने गरुडाशी लढत राहतो, त्याच्यासमोर सुटकेसाठी अन्य कोणताच मार्ग नसतो. तो चोचीने पंख फडफडवत, गरुडाला दूर ढकलण्याचा प्रयत्न करीत राहतो. त्यानंतर तो ताकदीने गरुडाला छतावरून थेट खाली फरपटत आणतो. त्यानंतर गरुड एका लोखंडी रॉडमध्ये वाईटरीत्या फसतो आणि त्यामुळे गरुडाला पराभव स्वीकारून मिळालेली शिकार सोडून द्यावी लागते. गरुड स्वत:चा जीव वाचवण्यासाठी अखेर पंजे उघडतो आणि पक्षी मृत्यूला चकवा देत सुटका करून घेतो. मग तो पुनर्जीवन मिळाल्याच्या अनोख्या आनंदात आकाशात झेपावतो.
अखेर पक्षी पुन्हा आकाशात घेतो भरारी
कठीण परिस्थितीत हार मानणाऱ्यांना धैर्य देणारा असा हा अंजनदायी व्हिडीओ आहे. या व्हिडीओतून अशी शिकवण मिळते की, जोपर्यंत तुमच्यातील धाडस व धीर टिकून आहे तोपर्यंत तुम्ही कोणाचाही पराभव करू शकता; फक्त तुमची मनापासून प्रयत्न करण्याची इच्छा हवी. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी पक्ष्याच्या धाडसाचे कौतुक केले आहे.
गरुड आणि पक्ष्यातील संघर्षाचा हा व्हिडीओ @AMAZlNGNATURE नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, ज्यावर अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, जर प्रयत्न करण्याची इच्छा असेल, तर सर्व काही शक्य आहे. दुसऱ्याने लिहिले की, जिद्दीसमोर मृत्यू हरला. तिसऱ्याने लिहिले… हिंमत ठेवा, सर्व काही ठीक होते.