मुंबई हे भारतातील सर्वात मोठे महानगर आहे. या महानगरात प्रत्येकालाच घाई असते. आपले कार्यालय गाठण्यासाठी प्रत्येकजण धावत असतो. अशावेळी घरातील काम करणार कोण? हा एक प्रश्न असतो. या कामांसाठीही एक वर्ग राबत असतो. घरातील साफ-सफाई, धुणी-भांडी, जेवण बनवणे, गाडी चालवणे अशी कितीतरी कामे इतरांना द्यावी लागतात. ही कामे करणाऱ्या सध्या चांगले दिवस आल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील वकील आयुषी दोशी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक असाच प्रसंग कथन केला आहे. ज्यात त्यांनी त्यांच्या स्वयंपाकीचे उत्पन्न किती होते, याची आकडेवारी दिली आहे. ज्याची चर्चा आता सोशल मीडियावर होत आहे.
आयुषी दोशी यांनी त्यांच्या घरात जेवण बनविणाऱ्या स्वयंपाकीचे काम आणि त्याला मिळणारे पैसे याचे गणित मांडले आहे. त्यांनी म्हटले की, आमच्या घरी जेवण बनविणाऱ्या स्वयंपाकीला आम्ही महाराज म्हणतो. जेवण बनविण्यासाठी त्याला फक्त ३० मिनिटे लागतात. ज्यासाठी तो महिन्याला १८,००० रुपये घेतो.
आयुषी दोशी यांनी पुढे लिहिले की, त्यांच्या कॉम्प्लेक्समध्ये महाराज जवळपास १० ते १२ घरात हेच काम करतो. कुटुंबाच्या आकारानुसार, सहसा प्रत्येक घरात त्याला ३० मिनिटे लागतात. तसेच कामादरम्यान त्याला मोफत जेवण आणि चहाही मिळतो. शिवाय वेळेवर कामाचे पैसे मिळतात. कधी कधी तर तो निरोप न देता किंवा कोणतीही सूचना न देता काम उरकून लवकर निघूनही जातो.
दोशी यांनी पोस्ट करताच अनेक युजर्सनी आपापल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. अनेकांनी त्यांची पोस्ट अतिशयोक्ती असल्याचे म्हटले आहे. एका युजरने म्हटले, “तुमच्या घरात कामाला येणारी AI मशीन आहे का?” दुसऱ्या युजरने म्हटले, “तुमचे दहा जणांचे कुटुंब आहे का? ३० मिनिटांच्या कामासाठी प्रत्येक घरातून त्याला १८ हजार रुपये मिळत असतील, हेच मुळात साफ खोटे आहे.”
“बहुतेक जण दिवसातून एका तासासाठी ८-१० हजार रुपये घेतात. फक्त ३० मिनिटांत कोणते अन्न शिजवून तयार होते?”, असा प्रश्न उपस्थित करून एका युजरने दोशी यांच्यावर टीका केली. तर दुसऱ्या एका युजरने मजेशीर प्रतिक्रिया दिली. त्याने म्हटले, “जर तो ३० मिनिटांत संपूर्ण जेवण बनवत असेल तर त्याला तुम्ही महाराजच्या ऐवजी जादूगार का म्हणत नाही. जर तो एका दिवसात १० ते १२ घरात जेवण बनवत असेल तर त्याच्याकडे कोणती काळी जादू आहे, हे मला जाणून घ्यायला आवडेल.”

काही जणांनी ट्रोल केल्यानंतर आयुषी दोशी म्हणाल्या की, मी प्रसिद्धीसाठी ही पोस्ट केलेली नाही. देशातील सर्वात महागड्या शहरांपैकी एक असलेल्या मुंबईतील हा प्रत्यक्ष अनुभव आहे. जर तुम्हाला हे समजत नसेल, तर राहणीमानाचा वाढलेला खर्च कदाचित तुम्हाला माहीत नाही.
“आमचा महाराज किती पैसे कमवतो, हे सांगितल्यानंतर अर्ध्या देशाची नाराजी मी ओढवून घेत आहे, याची मला अजिबात कल्पना नव्हती”, असेही दोशी यांनी एका स्वतंत्र पोस्टमध्ये म्हटले आहे.