कर्नाटकात शुक्रवारी दुपारी अक्षरशः खळबळ उडाली, जेव्हा शोधमोहिमेसाठी आणलेला प्रशिक्षित हत्ती अचानक अनियंत्रित झाला आणि शहराच्या मध्यवर्ती भागातून वेगाने धावू लागला. काही क्षणांतच मुख्य रस्त्यांवर गोंधळ माजला, दुकानदारांनी शटर खाली ओढली आणि नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी पळापळ केली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे शहरात भीतीचं सावट पसरलं असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ या अनियंत्रित हत्तीच्या धुमाकुळाचा आहे. गुंडलूपेट शहरातील मुख्य रस्ता, बसस्थानकाजवळील परिसर, पोलिस ठण्यासमोरील भाग या ठिकाणी हत्ती धावताना दिसत आहे. हा व्हिडीओ स्थानिक रहिवाशांनी मोबाईलवर शूट केला आहे आणि काही मिनिटांतच तो सोशल मीडियावर वेगाने पसरला.
व्हिडीओमध्ये सुरुवातीला लोकांची पळापळ, दुकाने बंद करण्याची घाई आणि वाहनचालकांचा गोंधळ स्पष्टपणे जाणवतो. अचानक एक मोठा प्रशिक्षित हत्ती रस्त्यावरून वेगात जाताना दिसतो आणि त्याच्या मागे काही अंतरावर धावत येणारे दोन-तीन लोक तसेच वनविभागाचे अधिकारी दिसतात. हत्ती बसस्थानकाच्या अगदी जवळून जातो. काही क्षण रस्त्याच्या मधोमध तो थांबतो आणि नंतर पुन्हा धावायला सुरुवात करतो. काही जागी वाहनचालक गाड्या बाजूला घेताना दिसतात, तर काहीजण दुकानांच्या आत आश्रय घेतात.
व्हिडीओच्या शेवटी हत्ती शहराच्या बाहेरच्या दिशेने जाताना दिसतो आणि अधिकारी त्याच्या मागोमाग त्याला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसतात.वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हत्तीला कदाचित जंगलात कीटकांनी चावल्याने त्रास झाला आणि तो घाबरून दिशाभूल झाला, त्यामुळे तो मोहिमेच्या ठिकाणाहून थेट शहराच्या दिशेने धावत गेला.
पाहा व्हिडिओ
या व्हिडीओवर लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी हत्ती शहरात धावत आल्यानं निर्माण झालेल्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली असून, “सुदैवाने कुणाला इजा झाली नाही हेच मोठं भाग्य,” अशा प्रतिक्रिया दिसत आहेत. काहींनी वनविभागावर टीका करत, अशा मोहिमेदरम्यान अधिक सतर्कता आणि सुरक्षा उपायांची गरज व्यक्त केली आहे.
तर काहींनी हत्तीला दोष न देता, “प्राण्यांना त्रास झाला की ते घाबरतात, त्याची चूक नाही,” अशी सहानुभूती व्यक्त केली आहे. काही वापरकर्त्यांनी गुंडलूपेट परिसरात वारंवार अशी वन्यजीव हालचाल होत असल्याचं सांगत, “या भागात कायमस्वरूपी उपाययोजना करणं गरजेचं आहे,” अशी मागणी केली आहे.
