Cute baby reaction seeing first time: दृष्टी असणाऱ्यांना क्षणभर डोळे बंद केले किंवा अंधुक दिसू लागलं तरी ते अस्वस्थ होतात. मग ज्या मुलाला जन्मत:च दिसत नसेल किंवा ज्यांची अपघातात दृष्टी जाते त्यांना कसं वाटत असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. डोळे बंद केले तर फक्त अंधार दिसतो, मात्र आपल्यासाठी फार काळ ते करणंही कठीण आहे. डोळ्यांनी जग पाहू शकणाऱ्यांपेक्षा ज्यांना दृष्टी नाही त्यांना डोळ्यांचं महत्त्व अधिक समजू शकतं. एखाद्या व्यक्तीला दिसत नसेल आणि चमत्कार घडून त्या व्यक्तीला दिसू लागलं, तर त्या व्यक्तीच्या आनंदाला सीमाच उरणार नाही. असाच एक गोंडस मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहू शकण्याचं महत्त्व यालाच ठाऊक…
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकला आहे जो दुर्मिळ दृष्टिदोषासह जन्माला आला. त्यामुळे तो जग स्पष्टपणे पाहू शकत नव्हता. मुलाला जन्मापासूनच या दोषाचा त्रास होत होता. अनेक उपचार केल्यानंतर आणि खूप मेहनतीनंतर डॉक्टरांनी चष्म्याची एक जोडी तयार केली. या चष्म्यामुळे या मुलाचं आयुष्यच बदलून गेलं आहे.
डॉक्टरांनी मुलाला चष्मा बसवला आणि पहिल्यांदाच मुलाला जग स्पष्टपणे पाहता आलं. एवढंच नाही तर त्याने त्याच्या पालकांनाही पहिल्यांदा अगदी स्पष्टपणे पाहिलं. जन्मदात्या आईवडिलांना पहिल्यांदा पाहण्याचा आणि सर्वकाही दिसू लागल्याचा आनंद या मुलाच्या हावभावातून स्पष्टपणे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये या मुलाला डॉक्टरांनी चष्मा घातल्यानंतर त्याची जी प्रतिक्रिया होती ती पाहून तुम्हीसुद्धा भावूक व्हाल एवढं नक्की. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव त्याचा आनंद या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. तो काहीसा गोंधळलेलाही वाटत आहे, अर्थात ते साहजिकच आहे कारण एवढाशा जीवाला हा अनुभव पहिल्यांदाच येत होता. या मुलाची प्रतिक्रिया पाहून प्रत्येकजण हेच म्हणत आहे की हाच खरा आनंद आहे.
या मुलाचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर द अनकट डायलॉग्स नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ३० लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, या मुलाच्या प्रतिक्रियेने माझं मन जिंकलं. तर दुसऱ्याने म्हटले आहे की, किती आश्चर्यकारक! मला आठवते जेव्हा माझ्या कर्णबधिर मुलीला पहिल्यांदा श्रवणयंत्र मिळाले होते. तिची प्रतिक्रियाही अशीच होती. तसंच अनेकांनी या कुटुंबाचे अभिनंदनही केले आहे.