या आठवड्यात सोमवारी अर्थात ४ ऑक्टोबर रोजी फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप या तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर झालेल्या बिघाडामुळे तब्बल ५ ते ६ तास युजर्सला मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यानंतर फेसबुककडून झालेल्या तांत्रिक बिघाडाविषयी खुलासा देखील करण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा एकदा फेसबुक आणि इन्स्टाग्राम युजर्सला अडचणी आल्या असून त्याबाबत फेसबुककडून माफीनामा जारी करण्यात आला आहे.

शुक्रवारी रात्री जगभरातल्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर युजर्सला अडचणी येऊ लागल्या होत्या. काही युजर्सला डेस्कटॉपवर फेसबुकचा वापर करताना समस्या जाणवत होत्या, तर काही युजर्सना फेसबुक मेसेंजरवरून मेसेज पाठवण्यात अडचणी येत होत्या. इन्स्टाग्रामवर फोटो किंवा स्टोरी लोड होत नसल्याची तक्रार देखील अनेक युजर्सने केली. ट्विटरवर अनेक युजर्सनी आपल्या अडचणी शेअर करून मीम्स देखील व्हायरल करायला सुरुवात केली होती.

आठवड्याभरात दुसऱ्यांदा फेसबुक, इन्स्टाग्रामच्या वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे त्याविरोधात युजर्सनी तीव्र नापसंती व्यक्त केली. काही तासांच्या खोळंब्यानंतर फेसबुकनं हा तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्याचं जाहीर केलं. तसेच, एक माफीनामा देखील फेसबुककडून जारी करण्यात आला आहे. यामध्ये “गेल्या काही तासांमध्ये आमचं उत्पादन वापरताना अडचणी आलेल्या सर्वांची आम्ही माफी मागतो. आम्ही हा बिघाड आता दुरुस्त केला आहे आणि सर्वकाही आता सुरळीत असेल”, असं फेसबुककडून जाहीर करण्यात आलं आहे.

दरम्यान, हा बिघाड सुरू झाल्यानंतर काही युजर्सनी आपली नापसंती दर्शवण्यासाठी मीम्स देखील करायला सुरुवात केली. “फेसबुकनं ३ दिवसांचा आठवडा केला असावा, सोमवार आणि शुक्रवार शटडाऊन ठेवलंय” अशा आशयाच्या प्रतिक्रिया ट्विटरवर येऊ लागल्या होत्या.

तर काहींनी ट्रोल करणारे व्हिडिओ शेअर केले आहेत.