भारतीय परंपरेनुसार, कुटुंबात एखाद्याचा मृत्यू झाला, तर सुतक हे पाळावं लागतं. त्या काळात धार्मिक विधी आणि सण, समारंभ कटाक्षाने टाळले जातात. तुम्ही जर वर्षानुवर्षे गणपतीची प्राणप्रतिष्ठा करीत असाल आणि एखाद्या वर्षी सुतक आणि गणेश चतुर्थी एकत्र आली तर काय करावं याबाबत अनेकांमध्ये संभ्रम असतो. सुतक काळात गणपती आणण्यासाठीदेखील काही विशिष्ट मान्यता आहेत.
सुतक म्हणजे काय?
जेव्हा कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा ते कुटुंब दु:खात असते. त्यावेळी काही दिवस दुखवटाही पाळला जातो. त्यावेळी ते कुटुंब कोणतेही समारंभ किंवा सण साजरे करण्याच्या मन:स्थितीत नसते. तेव्हा कोणतेही धार्मिक विधी केले जात नाहीत. मग अशा वेळी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात खंड पडू नये म्हणून काय उपाय करावेत याचा एक व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. लगाव बत्ती या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओत सुतक काळ आणि गणपती याबाबतची माहिती प्रकाशित करण्यात आली आहे.
मृत्यूनंतर कुटुंबात दुखवटा असतो आणि अशा वेळी दु:खाच्या वातावरणात गणपती घरात आणणं योग्य मानलं जात नाही. गणपती किंवा कोणत्याही देवाची प्राणप्रतिष्ठा करणे हे अतिशय पवित्र कार्य असल्याचे मानले जाते. मात्र, घरात एखाद्याचा मृत्यू झाल्यास वातावरण अपवित्र होते. त्यामुळे अशा काळात गणपतीची प्राणप्रतिष्ठा करणे योग्य मानले जात नाही. तर मग गणपती प्राणप्रतिष्ठा करण्यात खंड पडू द्यायचा नसेल, तर काय करावं?
काही लोक त्या वर्षी गणपतीची मूर्ती आणणे टाळतात. पण त्यात खंड पडू द्यायचा नसेल, तर असे नातेवाईक ज्यांना सुतक लागत नाही किंवा शेजारी यांच्या मदतीने घरच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा करता येऊ शकते. या संदर्भातले सर्व पूजा, विधी हे त्यांच्याच हातून करून घेणे योग्य मानले जाते. त्याशिवाय पाच किंवा सात दिवसांचा गणपती ज्यांच्या घरी असेल, त्यांनी तो अशा परिस्थितीत दीड दिवसाचा ठेवायलाही हरकत नाही, असेही मानले जाते. परंपरेनुसार, या गोष्टीत भटजींच्या सल्ल्यानुसार बदल केले जातात. काही ठिकाणी सुतकानंतर घराचे शुद्धीकरण करून मगच गणपतीचे आगमन केले जाते.
दुसरी गोष्ट म्हणजे कुटुंबात मृत्यू झाल्यास तिथे उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण नसते. त्या कुटुंबातील व्यक्ती दु:खात बुडालेल्या असतात. पण, गणपती हा तर उत्साहात वाजत-गाजत साजरा करण्याचा सण आहे. त्यामुळे अशा वेळी साधेपणाने गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून घेऊन, परंपरा अखंडपणे चालू ठेवावी, असे सांगितले जाते. अशा विविध मान्यता वेगवेगळ्या ठिकाणांनुसार बदलत जातात. मात्र, दु:खाच्या प्रसंगी आनंदाच्या उत्सवापासून दूर राहण्याचा एक अलिखित आणि सामाजिक नियम आपल्या समाजात आहे.