‘फेकू एक्स्प्रेस २.०’ या फेसबुक पेजवरून व्हायरल झालेली एक पोस्ट सध्या समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरत आहे. यात दोन छायाचित्रे एकत्र करण्यात आली आहेत. एकात पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार घालताना दिसत आहेत तर बाजूलाच असलेल्या छायाचित्रात तेच गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसे याच्या पुतळ्याला वंदन करत आहेत. २८० हजार फॉलोअर्स असलेल्या या पेजवरून सुमारे साडेसहा हजार जणांनी ही पोस्ट शेअर केली आहे. ‘ये बिक गयी हे गोर्मिट – द ट्रथ ऑफ इंडिया’ या आणखी एका फेसबुक पेजला ही पोस्ट टॅगही करण्यात आली आहे, पण सध्या त्या पेजवर ही पोस्ट दिसत नाही, मात्र पंतप्रधान ज्या पुतळ्याला वंदन करताना दिसत आहेत, तो प्रत्यक्षात नथुराम गोडसेचा नसून भारतीय जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘इंटरनॅशनल बिझनेस टाइम्स’मध्ये ६ एप्रिल २०१७ रोजी हे छायाचित्र प्रसिद्ध झाले असून त्याखाली ‘भाजपच्या ३७व्या स्थापनादिनी उपाध्याय यांना वंदन करताना पंतप्रधान मोदी’ असे नमूद करण्यात आले आहे.
